
>> श्रीकांत वाड
बॅडमिंटन विश्वाचा अनभिषिक्त सम्राट आणि जगातील सर्वोत्कृष्ट बॅडमिंटनपटू लिन डॅन याने स्पर्धात्मक बॅडमिंटनला ४ जुलै रोजी अलविदा केला आहे. जगभरातल्या त्याच्या करोडो चाहत्यांसाठी त्याची ही निवृत्ती निश्चितच एक दुःखाची बातमी आहे , पण तितकीच त्याची ही एक्झिट अटळ होती हेही सर्वजण जाणतात. इसवी सन २००० पासून ते २०२० पर्यंत म्हणजे गेली दोन दशके या महान बॅडमिंटनपटूंने जगावर अधिराज्य गाजवले. या डावखुऱ्या,शैलीदार,आक्रमक चिनी खेळाडूला याची देहा याची डोळा २०१६ साली प्रत्यक्ष ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकताना मी पाहू शकलो हे मी माझे भाग्य समजतो . एक चाहता म्हणून नव्हे तर एक प्रशिक्षक म्हणून जेव्हा त्याच्या खेळाचा अभ्यास केला तेव्हा माझ्या असे लक्षात आले की या पठ्य्याच्य्या खेळात मुळी कच्चा दूवाच नाहीये. तो सर्वार्थाने परिपूर्ण खेळाडू आहे . असा खेळाडू शतकाशतकात एखादा जन्मतो.
वयाच्या सोळाव्या वर्षी त्याची पहिल्यांदा चीनच्या राष्ट्रीय संघात निवड झाली आणि नंतर त्याने मुळी मागे वळून पाहिलेच नाही. त्याच्या अजिंक्यपदांची आणि सुवर्णपदकांची यादी इतकी मोठी आहे की ती वाचूनच आपली छाती दडपते. वास्तविक पाहता रुडी हर्तोनो,तौफिक हिदायत, हान जी हान,मॉर्टन फ्रोस्ट,पीटर गेड, मिसबून सिदेक आदि महान बॅडमिंटनपटू जरूर होऊन गेले, पण लिन डॅनच्या उंचीपर्यंत कोणीच पोचू शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे.
२ ऑलम्पिक सुवर्णपदके (२००८ बीजिंग, २०१२ लंडन), ६ ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप मधील अजिंक्यपदे,५ वर्ल्ड चॅम्पियनशिप अजिंक्यपदे, ५ आशियाई बॅडमिंटन स्पर्धा सुवर्णपदके, शिवाय जागतिक स्तराच्या अत्युच्च दर्जाच्या स्पर्धांची एकूण ६६ एकेरीची अजिंक्यपद तर त्याने पटकावली आहेतच, पण चीनच्या राष्ट्रीय संघाला जगातील सर्वात मानाचे समजले जाणारे ६ थॉमस चषक तसेच ५ सुदीरमान चषक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा त्याने उचलला आहे. त्याने एकूण ७९४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि त्यातील ६६६ सामन्यांमध्ये त्याने विजय संपादन केला आहे. बॅडमिंटन जगतात या पराक्रमाची बरोबरी तर सोडाच पण जवळपास पोचणारी कामगिरी करू शकणारा असा कोणीही खेळाडू आजवर झाला नाही आणि पुढेही होणे जवळपास अशक्यप्राय मानले जाते.
या सम हाच अशा अद्वितीय लिन डॅन ची तुलना ही केवळ टेनिस विश्वातील रॉजर फेडरर किंवा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी होऊ शकते. रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यातील असामान्य लढती आणि गेले दशकभर बॅडमिंटन विश्वातील लिन डॅन आणि मलेशियन ली चॉग वी यांच्यातील स्पर्धा यांची तुलना करण्याचा मोह याठिकाणी आवरत नाही. मात्र याही लढतीमध्ये दोघांमध्ये झालेल्या ४० रोमहर्षक लढती मध्ये २८ वेळा बाजी मारत लिन डॅन ने वादातीत पणे वर्चस्व गाजवले.
त्याच्या खेळाची आणि कारकिर्दीची वैशिष्ठ्ये होती ती त्याची आक्रमकता, डिसेप्शन,योग्यवेळी योग्य फटके पेरण्याची क्षमता (कोर्ट क्राफ्ट), अत्युच्च दर्जाचा फिटनेस, शटलवरचं असामान्य नियंत्रण, तंत्रशुद्ध पदलालित्य आणि या सर्व तांत्रिक बाबी सह त्याचे असणारे अफलातून टेंपरामेंट! या साऱ्यामुळे लिन डॅन, सुपर डेन म्हणून ओळखला जात होता.
कारकीर्दीच्या पूर्वार्धात आपल्या रागीट व भडक स्वभावामुळे त्याने काही वाद जरूर ओढवून घेतले पण नंतर तो स्थिरावला, प्रगल्भ झाला आणि खेळाडू म्हणून देखील व माणूस म्हणून देखील परिपूर्ण झाला. त्याच्या चार जुलैला केलेल्या निवृत्ती घोषणेमध्ये त्याने त्याच्या संघ सहकाऱ्यांचे, शिक्षकांचे व चाहत्यांचे आभार मानताना सर्वाबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली आहे. पण त्याच्या आयुष्यात आणि कारकीर्दीमध्ये त्याने आपल्या सर्वात कट्टर व कडव्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या ली चोंग वी या मलेशियाच्या खेळाडूला मोठा मान-सन्मान आणि आदर दिला आहे. ली चोंग वीमुळे मला आयुष्यभर नेहमीच स्फूर्ती मिळत गेली व त्यामुळेच माझ्या हातून अधिकाधिक उत्तुंग कामगिरी होत गेली, असे लिन डॅन मोकळेपणाने मान्य करतो. गेले दोन वर्ष हा सुपरडॅन अनेक दुखापतींनी ग्रस्त होता. तसेच तरुण प्रतिस्पर्ध्यापेक्षा त्याच्या हालचाली मंदावत चालल्या होत्या. त्यातून टोकियोमध्ये होणारे २०२० चे ऑलिम्पिक लांबणीवर टाकण्यात आले व करोना मुळे जगातल्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द होत गेल्या. या सर्वाचा अपरिहार्य परिणाम आणि कारोना काळातून मुक्तता होऊन पुन्हा जोमाने खेळण्याची शक्यता दुरावत चालल्याने अखेर या महान खेळाडूला वयाच्या ३७ व्या वर्षी निवृत्ती घोषित करावी लागली. लिन डॅनची पत्नी माजी जगज्जेती झी झिंग फॅन व त्याचा चार वर्षाचा मुलगा या त्याच्या कुटुंबासाठी लिन डॅन निवृत्तीनंतर चा वेळ देणार आहे. पण जगभरातल्या त्याच्या असंख्य चाहत्यांना त्याची बॅडमिंटन कोर्टावरची उणिव कायम भासत राहील यात शंकाच नाही. तो नुसताच बॅडमिंटनचा रोल मॉडेल नव्हता तर साऱ्या उगवत्या खेळाडूंचा स्फूर्तिस्थान होता व ते अढळस्थान यापुढेही कोणी हिरावून घेईल असे मला वाटत नाही.
(टीप – लेखक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक आहेत)