
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील चिखली या गावात पशुवैद्यकीय दवाखानासमोर खडी वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने रस्त्याच्या कडेला बसलेल्या 5 वर्षीय बालकाला चिरडल्याने मुलाचा जाग्यावरच मृत्यू झाला. श्रेयस विलास रेगुड असे मुलाचे नाव आहे. राजूर ते दाभाडी रस्त्यावर चिखली येथे हा दुर्दैवी प्रकार घडला.
चिखली (दाभाडी) या गावातील श्रेयस मुलगा पशु वैद्यकीय दवाखानाजवळ रस्ताच्या कडेला बसलेला असतांना या रस्त्याने जाणाऱ्या भरधाव टिप्पर ( एमएच 21 बीएच 9639) च्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवल्याने सदरील बालक चिरडले गेले. या अपघातात श्रेयसचा जाग्यावरच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, नितीन ढिलपे, कालुशे, कान्हेरे व इतर पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन टिप्पर बदनापूर पोलीस ठाण्यात आणले तर मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला.




























































