वैदिक मंत्रोच्चारात बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले; सर्व चारधाम दर्शनासाठी खुले झाल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी

उत्तराखंडमधील चारधामांपैकी एक असलेल्या बद्रीनाथ धामचे दरवाजे रविवारी भाविकांसाठी उघडण्यात आले. दरवाजे उघडताच मंदिराचा परिसर ‘जय बद्री विशाल’ च्या जयघोषाने दुमदुमून गेला. तसेच यावेळी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.

दरवाजे उघडण्यापूर्वी पहाटे 4 वाजता, मंदिर समितीचे अधिकारी आणि कर्मचारी मंदिर परिक्रमेत सहभागी झाले आणि पहाटे 4.30 वाजता, श्री कुबेरजी दक्षिण दरवाज्याने मंदिर परिक्रमेत प्रवेश केला. सकाळी 5.30 वाजता द्वारपूजनाला सुरुवात झाली आणि अर्ध्या तासानंतर बद्रीनाथचे दरवाजे उघडण्यात आले. श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडल्यानंतर चार धाम यात्रा अधिकृतपणे सुरू झाली आहे. यावेळी हेलिकॉप्टरमधून भाविकांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण धाम भक्तीमय झाले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही यावेळी श्री बद्रीनाथ धाम गाठले. त्यांनी भगवान बद्रीनाथची विधीवत पूजा केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.

बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यापूर्वी मंदिर 40 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले होते. या वर्षी बद्रीनाथ धाम संकुलात फोटो आणि व्हिडिओ काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास 5 हजार रुपये दंड होऊ शकतो. धामचे दरवाचे उघडल्याने मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी मंदिरात पोहोचले आहेत. अक्षय्य तृतीयेला वैदिक मंत्रोच्चार आणि विधींमध्ये गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे 30 एप्रिल रोजी चार धाम यात्रा अधिकृतपणे सुरू झाली. केदारनाथचे दरवाजे 2 मे रोजी उघडण्यात आले. तर आता बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडल्याने सर्व चारही धामांचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. त्यामुळे आता चारधाम यात्रा सुरू झाली आहे.