
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे अनेकदा आक्षेपार्ह विधानं करून वाद ओढवून घेतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी संत तुकाराम महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आता त्यांनी शिर्डीचे थोर संत साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं आहे.
जबलपूर येथील पनागरमध्ये आयोजित केलेल्या श्रीमद्भागवतकथेच्या शेवटच्या दिवशी शास्त्री यांना साई बाबांवरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, साईबाबांना मी देव मानत नाही. कोल्ह्याची कातडी पांघरून कुणी वाघ होऊ शकत नाही, असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आमच्या धर्माचे शंकराचार्य यांनी साई बाबांना ईश्वराचं स्थान दिलेलं नाही. शंकराचार्य यांचं मत मानणं अनिवार्य आहे. त्यांच्या मताचं पालन करणं प्रत्येक सनातनी व्यक्तीचं कर्तव्य आहे. कारण ते धर्माचे पंतप्रधान आहेत. कोणतेही संत ते आपल्या धर्माचे असोत अथवा दुसऱ्या त्यांना ईश्वराचं स्थान देता येणार नाही. कोणतेही संत ते तुलसीदास असतील, सूरदास असतील किंवा इतर कोणतेही ते केवळ महापुरुष आहेत, युगपुरूष आहेत, परंतु ते देव नाहीत. आपण साईबाबांना संत म्हणू शकतो, फकीर म्हणू शकतो, पण देव नाही, असं धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले आहेत. या विधानानंतर आता नवीन वाद उद्भवण्याची चिन्ह आहेत.



























































