
बाजीप्रभू देशपांडे यांचा गनिमांसोबतचा पावनखिंडीतला झंझावात हे इतिहासातलं महत्त्वाचं पान. शिवरायांना विशाळगडावर सुखरूप पोहोचवण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी जिवाची बाजी लावत सिद्दी मसूदच्या सैन्याला पावनखिंडीमध्येच रोखून धरले. शिवरायांवरील निष्ठेपायी आणि स्वराज्य स्थापनेसाठी अफाट गनिमांसमोर बाजीप्रभू वाघासारखे लढले.
बाजीप्रभूंच्या समर्पणाने पावन झालेल्या या खिंडीला म्हणूनच पावनखिंड असे नाव पडले. स्टार प्रवाहवरील ‘जय भवानी, जय शिवाजी’ या मालिकेतून इतिहासातला हा महत्त्वाचा अध्याय पुन्हा जिवंत होणार आहे. हा ऐतिहासिक प्रसंग पुन्हा जिवंत करण्यासाठी मालिकेची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे. बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणारे अभिनेते अजिंक्य देव यांनी हा ऐतिहासिक प्रसंग शूट करण्याचा अनुभव सांगितला.
ते म्हणाले ‘ज्याच्यासाठी सारा केला होता अट्टहास असाच काहीसा हा प्रसंग आहे. हा सीन शूट करणे आव्हानात्मक होते. हा प्रसंग अंगावर शहारा आणणारा आहे. सीन शूट करताना इतकी स्फूर्ती आहे की थोडाही क्षीण जाणवत नाहीय. आमचे कलादिग्दर्शक अजित दांडेकर यांनी पावनखिंडीचा अतिशय हुबेहूब असा सेट उभारला आहे. प्रेक्षकांना हा खास भाग नक्कीच आवडेल.


























































