चिमुरडय़ांच्या वयाप्रमाणे वाढणारी सायकल; 21 वर्षांच्या प्रेम काळेने बनवली बॅलन्स बाईक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लहानपणापासून मुले सायकल चालवायला शिकतात. सायकल चालवणे हा खरे तर बॅलन्सचा खेळ आहे. लहानग्यांमध्ये बॅलन्सचे कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याच्या प्रेम काळे या युवकाने आगळीवेगळी सायकल विकसित केली आहे. तिचे नाव बॅलन्स बाईक असले तरी ती सायकलच आहे, तीही लाकडाची. त्याला पॅडल नाही किंवा ब्रेक नाही. 1 ते 5 वर्षे वयोगटाच्या मुलांसाठी तयार केलेली सायकल मुलांच्या वयाप्रमाणे वाढत जाते. म्हणूनच या लाकडी सायकलला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

पुण्याच्या प्रेम काळे याने ‘वॅमशिकल’ हे प्रोजेक्ट मे 2019 मध्ये लाँच केले. प्रेमला स्वतःची उत्पादने आणि इंजिनीअरिंग डिझाईन बनवायचे होते. त्यासाठी त्याने दहावीनंतर शाळा सोडली. त्याआधी नववीत असताना त्याने ड्रोन बनवले होते. दहावीत प्रेमने फोल्डिंग सायकलचे एक प्रोटोटाईप मॉडेल बनवले. ऑनलाइन व्हिडीओ बघून चुका करत, त्या सुधारत तो फोल्डिंग सायकल बनवायला शिकला. ते प्रोजेक्ट यशस्वी झाल्यावर त्याने लाकडापासून ‘बॅलन्स बाईक’ बनवायचा निर्णय घेतला.

प्रेमच्या वडिलांचे इंटेरियर साहित्याचे दुकान  आहे. त्यामुळे त्याला ‘वुड आर्ट’विषयी आकर्षण वाटू लागले.  बॅलन्स बाईकसाठी त्याने लाकडावर कोटिंग करून ते अधिक टिकाऊ केले. वुड कटरचा वापर करून घरच्या वर्कशॉपमध्ये डिझाईन बनवायचे काम सुरू केले. सायकलची फ्रेम तयार केली. सायकलला रुंद चाकं जोडली. त्याला स्टीलचे बोल्ट लावून घट्ट बसवले. मुलांना आराम मिळेल अशी आरामदायी सीट तयार केली. अखेर 2019 साली प्रेमने बॅलन्स बाईक लाँच केली.

तीन टप्प्यांत वापर

पहिला टप्प्यात दीड ते अडीच वर्षांच्या चिमुरडय़ांसाठी तीनचाकी (ट्रायसिकल) असते. दुसरा टप्प्यात ती अडीच ते साडेतीन वर्षे वयाच्या मुलांसाठी दोनचाकी सायकल बनते, तर तिसऱया टप्प्यात साडेतीन ते पाच वर्षांच्या चिमुरडय़ांसाठी सायकलला थोडी लांब केली जाते. म्हणजे एक सायकल पाच वर्षांपर्यंतची मुले चालवू शकतात. सीटची उंची हवी तशी कमी-जास्त करता येते. मुलांच्या वयाप्रमाणे सायकल वाढते. ती वजनाने हलकी असल्यामुळे मुलांना ती सहज चालवता येते. तसेच पालकांना कुठेही सहजरीत्या नेता येते.

लहान मुले जेव्हा सायकल चालवतात, तेव्हा बाजूच्या साईड व्हीलवर बॅलन्ससाठी अवलंबून राहतात, पण मी तयार केलेल्या लाकडी सायकलवर मुले कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच बॅलेन्सिंग करतात. त्यांच्यात तसं कौशल्य निर्माण होतं. मुलांचा आत्मविश्वास वाढतो. स्नायूंची वाढ होते, व्यायाम होतो. ‘वॅमशिकल’ला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. सध्या ऑनलाइन मार्केटिंग सुरू आहे.
– प्रेम काळे, पुणे