प्रवीण दरेकरांनी जास्त जीबीचा पेनड्राईव्ह घ्यावा – बाळासाहेब पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावरील कारवाईत महाविकास आघाडी सरकारची सुडाची भूमिका नाही. मात्र, राग आल्याने ते पश्चिम महाराष्ट्रातील संस्थांची माहिती घेत आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सहकारातील काम मोठे आहे. सहकार विभागाची माहिती घेताना दरेकरांनी जास्त जीबीचा पेनड्राईव्ह घ्यावा म्हणजे जास्त डाटा बसेल, असा टोला सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी लगावला.

विरोधी पक्षनेते दरेकर यांनी साताऱ्यात सहकारी संस्थांच्या भ्रष्टाचारासंदर्भात वक्तव्ये केलेली होती. त्या संदर्भात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारची भूमिका मांडली.

मंत्री पाटील म्हणाले, ‘मुंबई जिल्हा बँकेवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे अध्यक्ष म्हणून काम पाहात होते. ते मजूर संस्थांतून निवडून येत होते. त्याबाबत त्यांची तक्रार करण्यात आली. त्याची सहकार विभागाच्या वतीने चौकशी झाल्यावर त्यांना मजूर म्हणून अपात्र जाहीर केले आहे. दरेकर यांच्याबद्दल आम आदमी पक्षाच्या शिंदे यांनी सहकार व गृह विभागाकडे तक्रार केली होती. त्यामध्ये त्यांनी मजूर या व्याखेत बसून अनेक वर्षे मुंबई जिल्हा बँकेवर काम केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. विधान परिषदेला उभे राहताना प्रवीण दरेकर यांनी प्रतिज्ञापत्रात व्यवसाय म्हणून स्वतःची नोंद केली होती. मजूर म्हणून नोंद केलेली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये राजकीय सूड उगवण्याची महाविकास आघाडी सरकारची भूमिका नाही.

बाजार समित्यांच्या निवडणुका एप्रिलमध्ये

सध्या विकास सेवा सोसायटीच्या निवडणुका सुरू असून, काही सोसायटय़ांच्या निवडणुका बाकी आहेत. विकास सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया संपताच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल एप्रिल महिन्यानंतर शेवटच्या आठवडय़ात वाजणार असल्याचे सूतोवाच सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत.

महाविकास आघाडी सरकार भक्कम

विरोधी पक्षाकडून सरकार पाडण्यासाठीच्या सातत्याने तारखा देण्यात येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेली 10 मार्च तारीख होऊन नऊ दिवस झालेत. मात्र, महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे, असे लक्षात आल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही 2024 पर्यंत थांबतो आहोत, असे सांगितले आहे. मात्र, आम्ही 2024 च्या निवडणुकीलाही महाविकास आघाडी म्हणून दमदारपणे सामोरे जाऊ, असा विश्वास सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.