
नाशिक शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी आज ‘मातोश्री’ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी सानप यांना शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.
बाळासाहेब सानप यांच्या शिवसेना प्रवेशाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. सानप यांनी यापूर्वी महापौर, उपमहापौर, भाजपचे शहराध्यक्ष या पदांवर काम केले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐनवेळी त्यांचे तिकीट कापल्याने नुकतीच त्यांनी राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती, मात्र ते पराभूत झाले. सानप यांच्या प्रवेशावेळी शिवसेना नेते, उत्तर महाराष्ट्र विभागीय नेते खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार राहुल शेवाळे, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी आदी उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे मी निष्ठsने काम करीन. पक्षवाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करीन. माझ्यावर जी जबाबदारी देतील ती मी पार पाडेन. शिवसेनेने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवीन असे बाळासाहेब सानप यांनी सांगितले.
































































