शिवतेजाला वंदन! उद्या शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदिन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मंगळवार 17 नोव्हेंबर रोजी महानिर्वाणदिन. शिवसेनाप्रमुख म्हणजे शिवतेज. मराठी माणसाच्या हृदयात अस्मितेचा अंगार आणि अवघ्या देशात हिंदुत्वाचा वन्ही चेतविणाऱया या शिवतेजाला वंदन करण्यासाठी शिवतीर्थावर लाखो शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींचा जनसागर उसळतो. यंदा मात्र कोरोनाचे संकट जगावर कोसळले आहे. म्हणूनच आहात तेथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या ‘साहेबां’ना मंगळवारी प्रत्येक शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी घरातून, कार्यालयातून आणि मनामनातून ‘जय महाराष्ट्र’ अशी साद घालत मानवंदना देईल!

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला स्वाभिमानाचा विचार दिला. त्यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवतीर्थासह महाराष्ट्रभरात होणाऱया त्यांच्या सभांना लाखो लाखोंचा जनसागर उसळत होता. याच जनसागराच्या उपस्थितीत 17 नोव्हेंबर 2012 रोजी हे धगधगणारे शिवतेज शिवतीर्थावर अनंतात विलीन झाले. मात्र शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींच्या मनात ते आजही कायम आहे आणि विचारांच्या रूपाने पिढ्यान्पिढ्यांच्या धमन्यांत ते कायम सळसळणार आहे.

गर्दी करू नका, नियम पाळा

कोरोनाचे संकट अद्यापही कायम असल्याने गर्दी करू नका, संयम पाळा असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ‘शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदिन आहे. शिवसेनाप्रमुखांचे सर्वांच्या हृदयातील स्थान मला ठाऊक आहे. तुमच्या भावना आणि श्रद्धा मी समजू शकतो, पण यावेळी संयम पाळा. शिवतीर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावर येऊन त्यांना मानवंदना द्यावी ही प्रत्येकाचीच भावना आहे. पण तुम्ही जिथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या. शिस्त आणि नियमांचे पालन करा, हीच शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली ठरेल,’ अशी कळकळीची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.