एकही झाड न तोडता शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारणार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व स्मृतीवन उद्यान उभारण्यासाठी प्रियदर्शिनी उद्यानातील एकही झाड तोडणार नाही. उलट फळा, फुलांची झाडे लावून हा परिसर निसर्गरम्य करण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

एमजीएम परिसरातील प्रियदर्शिनी उद्यानात उभारण्यात येणाऱया शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या नियोजित जाaगेची पाहणी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रियदर्शिनी उद्यानातील जागेची पाहणी केली. हा 17 एकरचा परिसर निसर्गरम्य असून, झाडांनी बहरलेला आहे. नियोजित स्मारक परिसरातील एकही झाड तोडणार नाही. उलट यामध्ये आणखी वाढ करून झाडांची लागवड करून वन्यजीवांना आवश्यक असलेल्या जांभूळ, सोनचाफा या वृक्षांची लागवड या ठिकाणी करावी.  यामध्ये विविध पक्ष्यांचा अधिवास वाढेल याचा विचार व्हावा तसेच पर्यावरणपूरक रचनेवर आधारित स्मारकाची उभारणी करण्यावर भर द्यावा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आठ दिवसांत स्मारकाचा फेरआराखडा तयार करा

प्रियदर्शिनी उद्यानातील नियोजित स्मारकाच्या जागेची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी तातडीने स्मारकासंदर्भात आढावा बैठक घेतली. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी महापालिकेने 64.50 कोटींचा आराखडा तयार करून निविदा प्रक्रिया राबवली आहे. परंतु स्मारकाच्या आराखडय़ामध्ये अनेक बदल सुचविण्यात आल्यामुळे पालकमंत्री देसाई यांनी आठ दिवसांत स्मारकाचा फेरआराखडा तयार करावा तसेच या कामासाठी अल्पमुदतीची फेरनिविदा काढण्यापूर्वी अंदाजपत्रकास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तांत्रिक मान्यता घ्यावी, असे आदेश त्यांनी दिले.  शिवसेनाप्रमुखांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. त्याचबरोबर चिल्ड्रन पार्क, चिल्ड्रन प्ले ग्राऊंड यामध्ये असणार आहे. बांधकामासाठी नैसर्गिक दगडांचा वापर केला जाईल.