बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यासाठी 5 हजार उमेदवारांची नोंदणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाने बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून, 5 जानेवारीला संभाजीनगरातील कलाग्राम येथे होणाऱ्या या मेळाव्यासाठी तब्बल 5 हजार उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. या मेळाव्यास मराठवाड्यातील बेरोजगार तरुणांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

मराठवाडा हा दिवसेंदिवस उद्योग क्षेत्रात भरारी घेत असून देशाबाहेरील कंपन्यांना गुंतवणूक करता यावी, त्यांच्या उद्योगांना पूरक वातावरण निर्माण करण्यावर उद्योग व खनिकर्ममंत्री सुभाष देसाई भर देत आहेत. विभागातील तरुणांना रोजगार मिळावा तसेच उद्योगांना कुशल कामगार, या उद्देशाने बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा राज्यात ठिकठिकाणी घेण्यात येत आहे. या मेळाव्यात राज्यातील औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या जवळपास 100 हून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. उमेदवारांना आपल्या पसंतीच्या ठिकाणी रोजगार निवडण्याची संधी या मेळाव्यात उपलब्ध होणार आहे. तसेच मेळाव्यामध्ये सहभागी होऊन संभाव्य कंपन्या, संस्थाचालकांकडून थेट मुलाखतीद्वारे निवड होणार असल्याने कंपन्यांनाही सोपे होत आहे.

रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी
मराठवाड्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम शिवसेनेच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. शासकीय नोकऱ्यांच्या रखडलेल्या भरतीमुळे बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा आयोजित केला जात आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या http://www.balasahebthackerayrojgarmelava.com/ संकेतस्थाळवर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर प्राप्त माहितीनुसार नोकरीची संधी उपलब्धतेचे मार्गदर्शन केले जाते. त्यानुसार उमेदवारांना संधी उपलब्ध करून दिली जाते.

100 हून अधिक कंपन्या होणार सहभागी
मराठवाड्यातील बेरोजगार तरुणांसाठी प्रथमच विभागीय स्तरावर बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्यासाठी 5 हजारहून अधिक बेरोजगार तरुणांनी नोंदणी केली आहे. 100 हून अधिक कंपन्या यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांनी दिली.

एकाच छताखाली मिळणार रोजगार
या रोजगार मेळाव्यात दहावी उत्तीर्ण उमेदवारांसह पदवी, अभियांत्रिकी, आयटीआय, पॉलिटेक्निकच्या तरुणांना एकाच छताखाली रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत असून, अशा प्रकाराचा मेळावा प्रथमच आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या आयोजनामुळे तरुणांमध्ये उत्साह संचारला असून ऑनलाईन नोंदणीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.