बाळासाहेब ठाकरे नगरातील स्मृतिशिल्प ठरले नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र

1107

कुर्ला विधानसभा क्षेत्रात टिळकनगर (पूर्व) येथील माननीय बाळासाहेब ठाकरे नगरात शिवसेनाप्रमुखांचे उभारलेले भव्य स्मृतिशिल्प नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. 20 फूट लांब आणि 15 फूट रुंदीचे हे शिल्प पाहण्यासाठी कुर्ला, टिळकनगर, नेहरूनगर परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत. तसेच शिल्प पाहिल्यानंतर नागरिक शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

टिळकनगर येथील म्हाडा वसाहतीचे माननीय बाळासाहेब ठाकरे नगर असे नामकरण केल्यानंतर येथे शिवसेनाप्रमुखांचे भव्य स्मृतिशिल्प उभारण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या निधीतून भव्य स्मृतिशिल्प उभारण्यात आले आहे. या शिल्पाचे उद्घाटन नुकतेच शिवसेना विभागप्रमुख आमदार संजय पोतनीस यांच्या हस्ते झाले. शिल्पकार विनायक सुर्वे आणि भावेश चित्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ-दहा कलाकारांनी तब्बल दोन महिने मेहनत घेऊन हे शिल्प साकारले आहे. बाळासाहेब ठाकरे नगर या नावाला अनुरूप असे आकर्षक शिल्प उभे राहिल्याने रहिवासी समाधान व्यक्त करत आहेत, तर अनेक जण भेट देऊन स्मृतिशिल्पाची माहिती घेत असल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी सांगितले.

आकर्षक विद्युत रोषणाई

म्हाडा वसाहतीमधील नागरिकांच्या आग्रहास्तव उभारलेल्या या स्मृतिशिल्पावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच ठिकठिकाणी एलईडी लाइटस् बसवल्याने सायंकाळनंतर शिल्पाच्या सौंदर्यात भर पडत आहे. दरम्यान, या शिल्पाची देखभाल माननीय बाळासाहेब ठाकरे नगर ज्येष्ठ नागरिक संघ व समन्वय समिती करणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या