शिवसेनाप्रमुखांच्या भव्य पुतळय़ाचे आज लोकार्पण! मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांच्या उपस्थितीत साजरा होणार दिमाखदार सोहळा

फुलांची सजावट, आकर्षक रोषणाई आणि ठिकठिकाणी डौलाने फडकणाऱया भगव्या झेंडय़ांमुळे संपूर्ण पर्ह्ट परिसर भगवामय झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या, 23 जानेवारी रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे, पर्यटन-पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा होणार आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा गेट वे ऑफ इंडियाजवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील बेटावर उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी 23 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता होत आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून उद्योगमंत्री सुभाष देसाई, उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, पालिका सभागृह नेता विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

असा रंगणार सोहळा

या सोहळ्यानिमित्त संपूर्ण पर्ह्ट परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. याशिवाय शिवसेनाप्रमुखांच्या प्रखर विचारांचे कटआऊटही लावण्यात आले आहेत, अशी माहिती विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी दिली.

तर पालिकेकडून पुतळ्याच्या ठिकाणी दोन एलईडी लाइट कायमस्वरूपी लावण्यात आले आहेत. तसेच फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तर सोहळ्यामध्ये मान्यवरांसाठी मंडप उभारण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी पोलीस, वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणांसोबत समन्वयाने कार्यवाही करण्यात येत असल्याचे ‘ए’ विभागाच्या सहायक आयुक्त चंदा जाधव यांनी सांगितले.  

स्थानिक पोलिसांसह व्हीआयपी सिक्युरिटी

शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पर्ह्ट विभागात स्थानिक पोलिसांसह व्हीआयपी सिक्युरिटी तैनात ठेवली जाणार आहे. शिवाय ‘ल’ विभागासह राखीव पोलीस, वाहतूक पोलीस यांची सुरक्षाही तैनात राहणार आहे. तसेच पोलिसांची अतिरिक्त कुमक, बॉम्बशोधक पथकही कार्यक्रमस्थळी राहणार आहे. याशिवाय संपूर्ण परिसरावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते उपायुक्त चैतन्य यांनी सांगितले.   

शिवसेनाप्रमुखांचा मुंबईतील पहिलाच भव्य पुतळा  

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल केवळ मुंबई-महाराष्ट्रातच नव्हे, तर देशविदेशात प्रचंड कुतूहल, आदर आहे. संपूर्ण हिंदुस्थानचे ते लाडके नेते होते.  शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि सामाजिक कार्याचे स्फूर्तिदायक स्मरण लोकांसमोर कायम रहावे आणि शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांचा मुंबईत उभारलेला हा पहिलाच भव्य पुतळा ठरला आहे.

असा आहे  दिमाखदार पुतळा

  • शिवसेनाप्रमुखांच्या या पुतळय़ाची उभारणी प्रबोधन प्रकाशनच्या वतीने करण्यात आली आहे.
  • पुतळा 9 फूट उंच असून बाराशे किलो ब्राँझपासून बनविण्यात आला आहे.
  • पुतळा दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे 14 फूट उंचीच्या चौथऱयावर बसविण्यात आला आहे.
  • पुतळा शिल्पकार शशिकांत वडके यांनी बनवला आहे.
  • फुलांची सजावट, आकर्षक रोषणाई, फोर्ट परिसर भगवामय

स्थळ :  डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर, पर्ह्ट

वेळ : सायंकाळी 6 वाजता

आपली प्रतिक्रिया द्या