महागाई वाढल्याने धर्माच्या नावावर राजकारण -बाळासाहेब थोरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी-2024 ची लोकसभा डोळ्यासमोर ठेवून काम केले जात असून, महागाई वाढली की, धर्माच्या नावाने राजकारण केले जात आहे. त्यामुळे आपला देश सध्या कठीण परिस्थितीतून जात असला, तरी आम्ही इंग्रजांविरोधात लढलो असल्याने आम्ही घाबरणार नाही. यांच्याविरोधातही लढत राहू, असा निर्धार आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला. दरम्यान, ज्या तंत्रज्ञानाला विरोध केला त्याचाच वापर करून सत्तेवर आलेल्या या एनडीए सरकारने आठ वर्षांत काय केले, असा सवालही त्यांनी केला. माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या 78व्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या सद्भावना दौड रॅलीत ते बोलत होते.

थोरात म्हणाले, ‘महात्मा गांधी यांनी दिलेल्या अहिंसेच्या विचाराने या देशात लोकशाही टिकली आहे. आजही संपूर्ण देशात छत्रपती शाहू महाराजांचे नाव घेतले जाते. तो विचार पुढे घेऊन पुढे जाण्याचे काम केले जात असून, काँग्रेसला ताकद देणारा जिल्हा म्हणून या कोल्हापूरचे नाव घ्यावे लागते.’

उद्धव ठाकरे यांच्या कामाची नोंद इतिहासात होईल
कोरोना काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाची नोंद जगाने घेतली आहे. देशात पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत त्यांचे स्थान आहे. त्यामुळे आजारपणामुळे ते काही करू शकले नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य चुकीचे आहे. महाविकास आघाडी सरकारने खूप चांगल्या पद्धतीने काम केले आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची इतिहासात नोंद होईल, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीसांना फटकारले.