लोकशाही,संविधानाच्या रक्षणासाठी लढा देण्याची वेळ – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

688

आपल्या पूर्वजांनी प्राणांचे बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. काँग्रेस पक्षाने देशात लोकशाही रूजवली. मात्र, केंद्रातील भाजप सरकार संविधानाला पायदळी तुडवून देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी 1942 च्या लढ्याप्रमाणे पुन्हा लढा देण्याची वेळ आली आहे, काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यासाठी सज्ज राहवे, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. स्वातंत्र्य चळवळीतील निर्णायक लढा असणाऱ्या ऑगस्ट क्रांती लढ्याला आज 78 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी सकाळी ऑगस्ट क्रांती मैदानातील हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले.

काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना थोरात म्हणाले की, 1942 मध्ये आजच्या दिवशी महात्मा गांधी यांनी मुंबईच्या ऐतिहासीक ऑगस्ट क्रांती मैदानातून इंग्रजांविरोधात ‘चले जावो, भारत छोडो’ चा नारा दिला होता. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जात, धर्म, प्रांत विसरून देशातील लाखो लोक या लढ्यात सहभागी झाले व देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारांनी या देशात लोकशाही रूजवली व वाढवली. मात्र, केंद्रातील भाजप सरकार संविधानाला पायदळी तुडवून या देशातील लोकशाही मोडीत काढून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे. सत्ता आणि पैशाचा वापर करून विविध राज्यातील विरोधी पक्षांची लोकनियुक्त सरकारे पाडली जात आहेत. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय यासारख्या संस्थांचा वापर विरोधी पक्षांना संपवण्यासाठी केला जात आहे. जाती, धर्माच्या आधारे देशातील लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे लोकशाही, संविधान, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता यांच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा 1942 च्या लढ्याप्रमाणे लढा उभारून धर्मांध, जातीयवादी भाजपला चले जावो सांगण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन थोरात यांनी केले. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या