
बलोच नेते मीर यार बलोच यांनी पाकिस्तानमधील नैसर्गिक संसाधनांबद्दल केल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की या प्रदेशात असलेले प्रचंड तेल आणि खनिज साठे प्रत्यक्षात ‘बलुचिस्तान प्रजासत्ताक’चे आहेत, ते पाकिस्तानचे नाहीत. मीर यार बलोच म्हणाले की, ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाची पाकिस्तानी लष्कराने, विशेषतः लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी दिशाभूल केली आहे.
मीर यार बलोच यांनी ट्रम्प यांच्या या प्रदेशात असलेल्या तेल आणि खनिज संसाधनांबद्दल केलेल्या दाव्याला गैरसमज म्हटले. बलोच म्हणाले की ही संसाधने पंजाबमध्ये नाहीत तर बलुचिस्तानमध्ये आहेत आणि त्यांचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही.या प्रदेशात प्रचंड तेल आणि खनिज साठे आहेत, हे बरोबर आहे. तेल, नैसर्गिक वायू, तांबे, लिथियम, युरेनियम आणि दुर्मिळ खनिजे असे खनिज साठे पाकिस्तानच्या पंजाबमध्ये नसून बलुचिस्तानमध्ये आहेत आणि हा भाग पाकिस्तानचा नाही तर बलुचिस्तान प्रजासत्ताक आहे जो पाकिस्तानने 1948 मध्ये बेकायदेशीरपणे ताब्यात घेतला होता.
ट्रम्पने गुरुवारी सोशल मीडियावर लिहिले की अमेरिका आणि पाकिस्तानने एक करार केला आहे. त्यात ते संयुक्तपणे पाकिस्तानमध्ये मोठे तेल साठे विकसित करतील. त्यांनी असेही म्हटले की कदाचित एक दिवस पाकिस्तान हिंदुस्थानला तेल विकेल. मीर यार बलोचने ट्रम्प यांना इशारा दिला की पाकिस्तानचे सैन्य आणि त्यांची गुप्तचर संस्था आयएसआय बलुचिस्तानच्या खनिज संपत्तीचा वापर दहशतवादाला चालना देण्यासाठी करतील, जो जागतिक सुरक्षेसाठी गंभीर धोका असेल. पाकिस्तानी सैन्य आणि त्यांची एजन्सी आयएसआयला बलुचिस्तानमधील ट्रिलियन डॉलर्सच्या संसाधनांमध्ये प्रवेश देणे ही एक धोरणात्मक चूक असेल. यामुळे आयएसआयची आर्थिक आणि कार्यक्षम क्षमता वाढेल आणि ती जगभरात दहशतवादी नेटवर्क पसरवू शकते, ज्यामुळे 9/ ११ सारखे हल्ले पुन्हा होण्याची शक्यता वाढेल, असा इशाराही त्यांनी ट्रम्प यांना दिला आहे.