
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून एक व्हिडीओ समोर आला आहे. बलूच लिबरेशन आर्मीच्या (BLA) कैदेत असलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी रडत-भेकत आपल्या सुटकेसाठी पाकिस्तान सरकारकडे याचना केल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. “आम्ही देशासाठी लढतो, पण संकट काळात सरकारला आमची कोणतीही पर्वा नाही,” असा गंभीर आरोप करत या सैनिकांनी आपल्या जीवासाठी टाहो फोडला आहे.
बलुचिस्तानमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, विद्रोही गटाने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी सैनिकांना ओलीस ठेवले होते. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये हे सैनिक अत्यंत दयनीय अवस्थेत दिसत असून, त्यांनी पाकिस्तानी लष्करी नेतृत्व आणि सरकारवर आपला संताप व्यक्त केला आहे.
व्हिडीओमध्ये एक सैनिक ढसाढसा रडताना दिसत असून तो म्हणतो आहे की, आम्ही सीमेवर शत्रूशी दोन हात करतो, स्वतःचे प्राण पणाला लावतो, मात्र जेव्हा आम्ही शत्रूच्या तावडीत सापडतो, तेव्हा सरकार आम्हाला वाऱ्यावर सोडून देते. आमच्या सुटकेसाठी प्रशासनाकडून कोणतेही ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. आमच्या कुटुंबाचे काय? आमच्या जीवाची किंमत या सरकारसाठी काहीच नाही का? असा आर्त सवाल या सैनिकांनी उपस्थित केला आहे.
या घटनेमुळे पाकिस्तानमधील सामान्य जनता आणि लष्करी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. व्हिडीओमध्ये सैनिकांनी थेट सरकारला उद्देशून म्हटले आहे की, जर तुम्ही आमच्यासाठी काही करू शकत नसाल, तर आम्ही कोणासाठी बलिदान द्यायचे? बलूच विद्रोहींनी हे व्हिडीओ प्रसारित करून पाकिस्तानी लष्कराचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, मात्र दुसरीकडे सैनिकांची ही अवस्था पाहून पाकिस्तान सरकारच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

























































