
सामना ऑनलाईन। लिथुआनियाई
युरोपमधील बाल्टीक समुद्रात एका जहाजाला भीषण आग लागली असून जहाजात ३३५ प्रवासी अडकले आहेत. जर्मनीमधील केल येथून लिथुआनियातील क्लायपेडा येथे हे जहाज जात होते. त्याचवेळी जहाजाच्या इंजिन रुममध्ये मोठा स्फोट झाला आणि आग लागली. दरम्यान यात कुठलीही जिवितहानी झालेली नसून प्रवाशांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने जहाजाबाहेर काढण्यात येत आहे. डेनिस फेरी कंपनीचे हे जहाज आहे. रेगीना सीवेज असे या जहाजाचे नाव आहे.
लिथुआनियाई नौदलाने टि्वटरवर या आगीबद्दल माहिती दिली आहे. तसेच बचावकार्य सुरू असून गरज पडल्यास २ अतिरिक्त बचाव पथकांना तयार राहण्याचे निर्देश लिथुआनियाई नौदलाने दिले आहेत. डेनिस फेरी कंपनीने मात्र रेगीना सिवेज जहाजावर २९४ प्रवासी असून जहाजातील इंजिनचा स्फोट झाल्याचे सांगितले आहे. येथील स्थानिक प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार रशियन सागरी हद्दीत ही घटना घडली आहे.

























































