
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवल्यानंतर मुस्लीम महिलांवर होणार्या खतना या प्रथेविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. विनाकारण शारिरीक हिंसा का केली जाते, एका प्रथेनुसार महिलांच्या गुप्तांगाला स्पर्श करण्याची परवानगीच कशी दिली जाते असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात माहिती देताना म्हटले की अनेक देशांत ही प्रथा बंद करण्यात आली असून हिंदुस्थानातही या प्रथेला पायबंद बसला पाहिजे. ही प्रथा असुरक्षित असल्याचे केंद्राने म्हटले आहे. तर दाऊदी बोहरातील धर्मगुरुंच्या म्हणन्यानुसार इस्लाम धर्मातील ही महत्त्वाची प्रथा असून मुस्लीम समाजात पुरुषांप्रमाणे महिलांचीही खतना केली जाते.
मुस्लीम महिलांच्या गुप्तांगास विकृत करण्याच्या या परंपरेला इंग्रजीत फीमेल जेनिटल म्यूटिलेशन (FGM) म्हटले जाते. मुस्लीम समाजात या प्रथेला खतना म्हणून ओळखले जाते. बोहरा मुस्लिम समाजात ६-८ वयादरम्यान मुलीची खतना केली जाते. या प्रक्रियेत योनीच्या बाहेरची त्वचा काढली जाते. वेदना शमवण्यासाठी खतनानंतर हळद, गरम पाणी आणि मलम लावले जाते. देशात गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये या समुदायाची संख्या लक्षणीय आहे. हा समुदाय हिंदुस्थानातील सर्वाधिक सुशिक्षित समाज मानला जातो. खतना केल्यानंतर महिलांच्या लैंगिक इच्छेवर ताबा मिळवता येतो असा समज या प्रथेमागे आहे तसेच या प्रथेमुळे लग्नापूर्वी महिला कुणाशीही शारिरीक संबंध ठेवू शकत नाही असेही मानण्यात येते. परंतु खतना प्रथेच्यावेळी त्या मुलीला इतक्या वेदना होतात की ती आयुष्यभर या वेदना विसरू शकत नाही.
संयुक्त राष्ट्रसंघाने या प्रथेविरोधात नाराजी दर्शवली असून ही प्रथा म्हणजे मानवाधिकाराचे उल्लंघन असल्याचे त्यांनी सांगितले होते. डिसेंबर २०१२ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या एका महासभेत जगभरात या प्रथेला संपुष्टात आणण्याचा संकल्प केला गेला. महिला खतना बाबतीत जागरूकता वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्रासंघाने या वर्षी ६ फेब्रुवारीला ‘इंटरनॅशनल डे ऑफ जीरो टॉलरेंस फॉर एफजीएम’ अर्थात जागतिक खतना विरोधी दिनाची घोषणा केली होती. दाऊदी बोहरा समाजाच्या अनेक महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या प्रथेवर बंदी घालण्याची मागणी केली होती. या प्रथेला बेकायदेशीर ठरवून भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा ठरवला जावा अशीही मागणी त्यांनी केली होती. या मागणीसाठी त्यांनी मोहीमही राबवली होती.

























































