प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी आणा!; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

प्लॅस्टिक आणि थर्माकॉलचा वापर खूप वाढला असून मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात हेच प्लॅस्टीक आणि थर्माकॉल अनेक भागांत गच्च बसल्याने पाणी जायला जागाच उरली नाही. हे अरिष्ट प्लॅस्टीकवर पूर्ण बंदी आणली तरच टळेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा. याबाबत कडक कायदा आहे. परंतु त्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया व साधनांचे शहरातले पहिले प्रदर्शन वरळीतल्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब येथे भरले आहे. या प्रदर्शनाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबईला खऱ्या अर्थाने सुंदर बनवण्यासाठी अशा प्रकारच्या प्रदर्शनाची गरज असल्याचे सांगितले. तसेच घनकचरा व्यवस्थापनाची सुरुवात प्रत्येक मुंबईकराने आपल्या घरापासून करावी, असे सांगितले.

या तीनदिवसीय प्रदर्शनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. यावेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर, महानायक अमिताभ बच्चन उपस्थितीत होते. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईतील वाढत्या कचऱ्याच्या समस्येमुळे विषारी वायूचे प्रमाण वाढत असून घनकचरा व्यवस्थापनाची गरज असल्याचे सांगितले. तर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी येणाऱ्या काळात कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे १०० टक्के ध्येय गाठण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. प्रदर्शनात ७० टक्के कंपन्या सहभागी झाल्या असून त्यात घनकचरा व्यवस्थापनाबद्दलच्या आधुनिक मशीन्स आणि विविध तंत्रज्ञान मांडण्यात आले आहे.

कचऱ्याचे व्यवस्थापन होणे गरजेचे
कचरा व्यवस्थापनाबाबत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, अरिष्ट आल्याशिवाय शहाणपण येत नाही. त्यामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन होणे अत्यंत गरजेचे आहे. हे सांगताना त्यांनी सुरत शहरात बऱ्याच वर्षांपूर्वी आलेल्या प्लेग रोगाचे उदाहरण दिले. या घटनेनंतर सुरत शहराचा चेहरामोहरा बदलला आणि हे बदसुरत शहर खुबसुरत झाले, असे ते म्हणाले.

प्रदर्शनाला येणारे बाहेर पिचकाऱ्या मारतात
आता या प्रदर्शनाला हजेरी लावलेले अनेक जण बाहेर जातील आणि आपल्या मित्राला फोनवर सांगताना तोंडातून पिचकाऱ्या मारत सांगतील. महागड्य़ा गाड्य़ांच्या काचा खाली करून आतून पानाच्या लांबवर जातील अशा पिचकाऱ्या मी पाहिलेल्या आहेत. याचा प्रचंड संताप येतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अमिताभ जे बोलतात ते करतात!
अनेक जण जे काही बोलतात ते विसरून जातात. कुठल्याही प्रकारचे अभियान असो महानायक अमिताभ बच्चन नेहमीच हाकेला धावतात. त्यांनी पालिकेच्या आणि सरकारच्या अभियानांमध्ये स्वत:हून सहभाग घेतला. हे त्यांचे सर्वात मोठे वेगळेपण आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अमिताभ यांचे कौतुक केले.

जे हिताचे आहे त्याची कडक अंमलबजावणी करणारेच खरे सरकार
सिंगापूरमध्ये च्युइंगम खाण्यावर बंदी आहे. त्या ठिकाणी शाळकरी मुले च्युइंगम खाऊन तो ट्रेनच्या दरवाजाला चिकटवतात. हे दरवाजे उघडल्यानंतर च्युइंगमच्या तारा समोर येतात. त्यामुळे तेथील सरकारने च्युइंगम खाण्यावर कडक निर्बंध घातले आहेत. जो च्युइंगम खाईल त्याला शिक्षा आणि दंड होतो. याला म्हणतात सरकार जे लोकांच्या हिताचे आहे त्याची कडक अंमलबजावणी करणारेच खरे सरकार, याकडे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

कचऱ्यापासून खतनिर्मिती; एफएसआयमुक्त – मुख्यमंत्री
कचऱ्याचे व्यवस्थापन करणे कळीचा मुद्दा असून ओला आणि सुका कचरा वेगळा करणे अत्यंत गरजेचे आहे. कचऱ्यापासून खतनिर्मिती हाही कचरा व्यवस्थापनाचाच एक भाग असून अनेक सोसायट्य़ांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशा प्रकारे खतनिर्मिती करणाऱ्या सोसायट्य़ांना प्रोत्साहन म्हणून तेवढाच भाग एफएसआयमुक्त करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्यात येईल असेही ते म्हणाले. महासिटी कंपोस्ट हा सरकारचा एक ब्रॅण्ड तयार करण्यात आला आहे. कचऱ्यापासून तयार केलेल्या कंपोस्ट खताला शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मागणी आहे. हे लक्षात घेऊन या ब्रॅण्डचे बिझनेस मोड्य़ुल्डही तयार करणार असण्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्ण प्लॅस्टिकबंदीवर विचार करण्याची सूचना केली. विशिष्ट मायक्रॉनच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आली असून त्याबद्दल कडक कायदाही आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना दिले.

प्रत्येकाने दहा फूट परिसरात स्वच्छता ठेवावी – अमिताभ
प्रत्येक मुंबईकराने आपल्या भोवतालच्या दहा फूट परिसरात स्वच्छता ठेवली तर मुंबई स्वच्छ होईल असेही अमिताभ म्हणाले. आपण कुठलीही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती आली की सरकार आणि पालिकेला दोष देतो. पण स्वच्छता असो किंवा कुठलीही नैसर्गिक आपत्ती जबाबदारी आपलीही आहे असे सांगतानाच कचरा व्यवस्थापनाची सुरुवात आपल्यापासून केली आहे असेही ते म्हणाले. याबाबत त्यांनी स्वत:चे उदाहरण दिले. मी माझ्या घरात कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करणारे मशीन आणणार आहे. आमच्या घरासमोरच्या बगिच्यासाठी आपण या खताचा वापर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अनोख्या आणि सुंदर प्रदर्शनाबद्दल महापालिका प्रशासनाला अमिताभ बच्चन यांनी धन्यवाद दिले.