धुळ्यात ‘हिंदुस्थान बंद’ ला गालबोट, व्यापारी संघटनांचा असहकार, दगडफेक, लाठीमार, अश्रुधूर

448

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि नागरिकत्व नोंदणी कायद्याची अंमलबजावणी विरोधात बहुजन क्रांती मोर्चाने बुधवारी देशव्यापी बंद पुकारला. या बंद दरम्यान धुळे शहरातील चाळीसगाव रोड आणि शंभर फुटी रोड परिसरात जमावात असलेल्या तरुणांनी हुल्लडबाजी केली. निरनिराळे दुकाने तसेच कार्यालयांवर दगडफेक करण्यात आली. पानटपऱ्या आणि लोटगाडीवरील दुकाने उलथवली. गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या दोन मोटार सायकलींची जमावाने तोडफोड केली. याशिवाय एक बोलेरो, एक इंडिका कारची देखील तोडफोड झाली. दगडफेकीत पोलिस उपअधीक्षकांच्या वाहनाचे नुकसान झाले. चाळीसगाव रोड, शंभर फुटी रोड या भागात दुपारी तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले. त्यामुळे बंदला गालबोट लागले.

बहुजन क्रांती मोर्चाने सरकारच्या नवीन नियमांच्या विरोधात बंद पुकारला होता. या बंदला बहुसंख्य डाव्या विचारांच्या पक्ष संघटनांनी तसेच मुस्लिम संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला. सकाळी बंदला संमिश्र प्रतिसाद होता. शहरातील बहुसंख्य व्यापार-उद्योग सुरु होते. परंतु दुपारी अकरानंतर चाळीसगाव रोड, शंभर फुटी रोड, मुंबई-आग्रा महामार्ग या भागात मुस्लिम तरुण मोठ्या संख्येने एकवटले. जमावातील काही तरुणांनी हुल्लडबाजी केली. काही दुकानांवर आणि घरांवर दगडफेक केली. काही हुल्लड तरुणांनी रस्त्याच्या काठावर असलेल्या पानटपऱ्या आणि इतर छोटी-छोटी दुकाने उलथवली. काही वेळाने पोलिस तेथे दाखल झाले. पोलिसांनी एका हुल्लड तरुणाला ताब्यात घेऊन पोलिस गाडीत बसविले. त्यामुळे जमावातील तरुणांनी थेट पोलिसांच्या वाहनाला घेराव घातला आणि तरुणाची सुटका करा अशी मागणी केली. अखेरीस पोलिसांनी नमते घेत संबंधीत तरुणाची सुटका केली. मात्र त्यानंतर जमावातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. तर काही तरुणांनी पुन्हा दगडफेक करण्यास सुरुवात केली. तेव्हा मात्र पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. मोठ्या प्रमाणात दगडफेक होत असल्याचे पाहिल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर काहीकाळ शांतता निर्माण झाली.

आपली प्रतिक्रिया द्या