वांद्रे पूर्वने घेतला ‘मोकळा श्वास’! एकही कंटेनमेंट झोन नाही, इमारतीही मुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> देवेंद्र भगत

पालिकेच्या वांद्रे पूर्व प्रभागात कोरोना चांगलाच आटोक्यात आल्यामुळे सद्यस्थितीत एकही कंटेनमेंट झोन राहिला नाही. शिवाय एकही इमारत किंवा इमारतीचा मजलाही सील नाही. त्यामुळे संपूर्ण वॉर्डने आता ‘मोकळा श्वास’ घेतला आहे. मुंबईत एकही प्रतिबंधित क्षेत्र नसणारा सद्यस्थितीमधील एकमेव प्रभाग ठरला आहे. या ठिकाणी रुग्ण दुपटीचा कालावधीही आता 600 दिवसांवर गेल्याने प्रभागाने कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच अनेक कोरोना हॉटस्पॉट निर्माण झाले. यामध्ये चाळी-झोपडपट्टय़ांसह इमारती अशी संमिश्र वस्ती असणाऱया वांद्रे पूर्व विभागातही कोरोना रुग्ण झपाटय़ाने वाढले. मात्र पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे आता वांद्रे पूर्वमध्ये कोरोना चांगलाच आटोक्यात आला आहे. वांद्रे पूर्वमध्ये आता केवळ 542 सक्रिय रुग्ण आहेत. या प्रभागात आतापर्यंत एकूण 22 हजार 662 रुग्ण आढळले असून सुमारे 21 हजारांवर रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

तिसऱया लाटेसाठी सज्ज, लहान मुलांसाठी 200 बेड

वांद्रे पूर्व प्रभागात सद्यस्थितीत मुंबई विद्यापीठ कॅम्पसमधील आयटी पार्क, बॉइज हॉस्टेल या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू आहेत. शिवाय वाकोला स्कूल येथे लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी क्वॉरंटाइनचीही व्यवस्था आहे. रुग्णांना जवळचेच बीकेसी जम्बो कोविड सेंटरही उपयुक्त ठरते.

दरम्यान, आरोग्यतज्ञांनी वर्तवलेल्या कोरोनाच्या तिसऱया लाटेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून तिन्ही कोविड केअर सेंटरमध्ये यंत्रणा कार्यरत आहे. तसेच आयटी पार्क येथे लहान मुलांसाठी 200 बेड तैनात करण्यात येत आहेत. या ठिकाणी स्तनदा मातांसाठीही सुविधा असेल.

लहान मुलांसाठी सुरू करण्यात येणाऱया या कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी खेळणी, झोपाळा, भिंतीवर कार्टून्स अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवाय एनआयसीयू, व्हेंटिलेटर अशी यंत्रणाही तैनात करण्यात येत असल्याची माहिती एच/पूर्वच्या सहायक आयुक्त अलका ससाणे यांनी दिली.

वांद्रे पूर्वमध्ये पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या आटोक्यात आली असून प्रभागाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजना आणि रहिवाशांकडून मिळालेले सहकार्य यामुळेच हे शक्य झाले आहे.
– अलका ससाणे, सहायक आयुक्त, एच/पूर्व