
ऐतिहासिक वांद्रे किल्ला परिसरात मुंबई महानगरपालिका सुशोभीकरण करणार असून संरक्षक भिंत, शोभिवंत जाळ्या, बेसाल्ट फुटपाथ, विजेचे दिवे, हेरिटेज थीमनुसार दिशा, चिन्हे उभारणार आहे. त्यामुळे वांद्रे किल्ला परिसराला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार आहे. यासाठी पालिका प्रशासनाला 20 कोटींचा खर्च येणार आहे.
मुंबईतील जे ऐतिहासिक किल्ले आहेत त्यापैकी एक वांद्रय़ाचा किल्ला आहे. पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला आजही तग धरून असला तरी त्याच्या आजूबाजूच्या परिसराची मात्र रया गेली आहे. त्यामुळे किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण पालिका करणार आहे. यात किल्ल्ले परिसरातील मोडकळीला आलेली संरक्षक भिंत पाडून पुन्हा उभारणे, शोभिवंत जाळ्या लावणे, सुशोभित प्रवेशद्वार, शौचालय बनवणे, गांडूळ खत तयार करण्यासाठी खड्डा, बेसाल्ट दगडाचे पदपथ बांधणे, हेरिटेज थीमच्या अनुषंगाने दिशा, चिन्हे आणि नावपट्टी लावणे, जलठिकाणे बांधणे, खराब झालेली बैठक व्यवस्था दुरुस्त करणे, मैदानात विद्युत दिवे लावणे, हिरवळीची कामे, शहरी वनीकरण इत्यादी कामे केली जाणार आहेत. ए. पी. आय. सिव्हिल कॉन ही कंपनी सुशोभीकरणाचे काम 18 महिन्यांत पूर्ण करणार आहे.
सुशोभीकरणाने पर्यटन वाढेल
पोर्तुगीजांनी 1640 मध्ये बांधलेल्या वांद्रे किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसरही रमणीय आहे. या किल्ल्यावर अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. सी लिंक आणि अरबी समुद्रामुळे या किल्ल्याचे सौंदर्य आजही मुंबईकरांना आकर्षित करते. सध्या इथे प्री वेडिंग शूट होते. आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण केले तर इथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील उद्यानांसाठी कंत्राटदार नेमणार
मुंबईतील 24 विभागांतील उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, मोकळ्या जागा, वाहतूक बेटे, रस्ता दुभाजक यांच्या देखभालीसाठी एकूण 108 कंत्राटदार नेमले जाणार आहेत. त्यासाठी46 कोटींच्या निविदांचे प्रस्ताव आले आहेत. एका वर्षासाठी असलेल्या कंत्राटांमध्ये उद्यानांची स्वच्छता, साफसफाई, सुरक्षारक्षक, पाण्याची सुविधा या गोष्टींचा देखभालीच्या कामात समावेश आहे. आगामी स्थायी समितीत हे प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहेत.
























































