
जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असताना सिमेंट टँकरच्या चाकाखाली आल्याने रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी बीकेसी परिसरात घडली. शराफत खान असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे. अपघात प्रकरणी ट्रक चालक राजेंद्र मानेला बीकेसी पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.
शराफत हा वांद्रे पश्चिम परिसरात राहत होता. गुरुवारी सायंकाळी रिक्षाचा गॅस संपल्याने तो गॅस भरण्यासाठी बीकेसी येथील गॅस पंपवर येत होता. आयकर भवन येथून जात शराफत हा डाव्या बाजूने रिक्षा घेऊन पुढे जात होता. तेव्हा राजेंद्रने डाव्या बाजूने टँकर घेतला. टँकर डाव्या बाजूला आल्याने जीव वाचवण्याच्या प्रयत्नात शराफतने बाहेर उडी टाकली. त्यामुळे शराफत हा टँकरच्या मागच्या चाकाखाली आला. अपघाताची माहिती समजताच बीकेसी पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी शराफतला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. अपघात प्रकरणी टँकरचालक राजेंद्र विरोधात बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


























































