
मालाड येथील एका प्रसिद्ध विकासकाला आंतरराष्ट्रीय नंबरवरून फोन करून दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावणाऱ्याला अखेर मालाड पोलिसांनी अटक केली. महेश संजीव पुजारी असे त्याचे नाव आहे. विकासकाला धमकी देण्यासाठी महेशने व्हीपीएन प्रणालीचा वापर केला होता. खंडणीच्या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून ते विकासक आहेत. त्यांचे गोरेगाव आणि अंधेरी येथे इमारतींचे प्रोजेक्ट सुरू आहेत. अंधेरी येथील प्रोजेक्टचा वाद न्यायालयात गेल्याने तेथील काम सध्या बंद आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी तक्रारदारांना एकाने संपर्क साधून मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, लॉकडाऊन काळात त्याचे संभाषण बंद झाले होते. त्याचदरम्यान त्यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमक्या येण्यास सुरुवात झाली. धमकीप्रकरणी तक्रारदारांनी मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.
वरिष्ठ निरीक्षक धनंजय लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विवेक तांबे, अशोक कांडे, गिरी, शेख यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान तक्रारदारांना ज्या नंबरवरून फोन येत होते त्याची माहिती काढली. धमकीसाठी व्हीपीएन प्रणालीचा वापर केल्याचे उघड झाले. ते फोन बंगळुरू येथून केल्याची माहिती समजताच तांबे यांचे पथक तेथे गेले. तेथून पोलिसांनी महेशला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने खंडणीसाठी धमकावल्याचे पोलिसांना सांगितले. महेश हा एका खासगी कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये काम करतो. त्याचे काही नातेवाईक परदेशात राहत असल्याने तो नातेवाईकांना व्हीपीएन प्रणालीचा वापर करून फोन करतो. त्यामुळे महेशने तक्रारदारांना व्हीपीएन प्रणालीचा वापर करून फोन केल्याचे तपासात उघड झाले. महेशला खंडणीचा फोन करण्याच्या मोबदल्यात काही रक्कम मिळणार होती. त्याला तो फोन कोणी करण्यास सांगितला. त्याचा तपास आता मालाड पोलीस करत आहेत.






























































