कचरा वेचणाऱ्या व्यंकटेशने पेरलं हिरवं सोनं, 80व्या वर्षी पाच झाडांची जिवापाड देखभाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे शहरीकरणाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड केली जात असताना बंगळुरूमधील 80 वर्षांच्या कचरावेचकाने अनोखा आदर्श घालून दिला आहे. व्यंकटेश असं या कचरा वेचकाचे नाव आहे. मंदीर परिसरात जे अन्नदान चालतं त्यावर व्यंकटेश आपली भूक भागवतात. असं असतानाही केआरपुरम येथील मोकळ्या जागेत त्यांनी पाच झाडं लावली असून या झाडांची ते मोठय़ा प्रेमाने देखभाल करतात.

घरदार नसलेल्या व्यंकटेश यांना कुणीही नातेवाईक नाही. भविष्यात एका डेरेदार वृक्षाखाली सावलीत बसायला मिळावं एवढंच त्यांचं स्वप्न होतं. त्यासाठीच त्यांनी झाडे लावली. झाडांना नियमित पाणी घालण्याचे काम तेच करतात. हॉटेलमधून पाणी मागून ते जमा करून झाडांना द्यायला त्यांनी सुरुवात केली होती.

बंगळुरूमध्ये जुलै 2020मध्ये पर्यावरणप्रेमींनी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली होती. साडेचार किलोमीटरच्या परिसरात त्यांनी 500 झाडे लावली होती. हे काम व्यंकटेश लांबून पाहत होते. त्यांनी आयोजकांना गाठून रोपांची मागणी केली. आयोजकांनी त्याला पाच रोपं दिली. काही दिवसांनी आयोजकांपैकी एक असलेले रघोत्तम त्या भागात आले होते. त्यांना व्यंकटेशने लावलेली रोपं दिसली. रोपं चांगली वाढली असून व्यंकटेश रोपांची मनापासून काळजी घेताना दिसले. रघोत्तम यांनी व्यंकटेशच्या कामाची खूप प्रशंसा केली.