‘बांगलादेश’चे झाले ‘इंदिरानगर’, भाईंदरमधील बसस्टॉपचा फलक बदलला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तनच्या डोंगर उतारावर वसलेल्या वस्तीला ‘बांगलादेश’ असे संबोधले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या ‘बांगलादेश’ चे अखेर ‘इंदिरानगर’ असे नामांतरण झाले असून मीरा-भाईंदर महानगरपालिकेने बसस्टॉपचा पूर्वीचा फलक काढून टाकला आहे. त्या जागेवर ‘इंदिरानगर’ असा फलक लावण्यात आला आहे. लवकरच आधारकार्ड, मालमत्ता कराचे बिल, रेशनकार्ड अशा सरकारी कागदपत्रांवर असलेल्या ‘बांगलादेश’ हे नावही हटवले जाणार आहे.

उत्तनच्या डोंगरावर ‘बांगलादेश’ वसले असल्याची बातमी १९ जून रोजीच्या दैनिक ‘सामना’ मध्ये प्रसिद्ध झाली होती. केवळ वस्तीचे नावच नव्हे तर बसस्टॉप, आधारकार्ड, मालमत्ता कराचे देयक यावरही तसाच उल्लेख होता. दैनिक ‘सामना’तील बातमी प्रसिद्ध होताच शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार राजन विचारे यांनी महापालिका आयुक्त दिलीप ढोले व जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे पत्रव्यवहार केला. तसेच बसस्टॉपसह सरकारी दप्तरी असलेली ‘बांगलादेश’ अशी नोंद तातडीने काढून टाकावीत, अशी मागणी केली होती.

प्रशासनाने घेतली दखल
या पाठपुराव्याची अखेर दखल घेण्यात आली असून आज तातडीने बसस्टॉपचा फलक हटवून तेथे ‘इंदिरानगर’ असा फलक लावण्यात आला. यापूर्वी या भागाला ‘इंदिरानगर’ असेच म्हटले जायचे, पण तेथे विविध राज्यातून आलेल्या लोकांमुळे ‘बांगलादेश’ असे म्हणणे सुरू झाले. मात्र प्रत्यक्षात उत्तनच्या डोंगरावर असलेल्या वस्तीमध्ये कोणीही बांगलादेशी राहत नाही. बसस्टॉपबरोबरच अन्य कागदपत्रांमध्ये असलेली बांगलादेश नोंद आता लवकरात लवकर हटवली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.