बांगलादेशी युवा गोलंदाजांचे अखिलाडू प्रतिपादन; जेतेपदानंतरच्या बीभस्त सेलेब्रेशनचे समर्थन

928

अंतिम फेरीपर्यंत पोचल्यावर पराभव झाल्यावर पराभूत संघाच्या खेळाडूंना काय वेदना होतात ते आम्हाला हिंदुस्थानी युवा संघाला दाखवून द्यायचे होते. याआधी काही स्पर्धांत हिंदुस्थानी संघानेही आम्हाला पराभूत केल्यावर आमच्यासारखेच प्रदर्शन मैदानात केले होते. त्याची परतफेड आम्ही दक्षिण आफ्रिकेतील युवा वर्ल्ड कप पहिल्यांदाच जिंकल्यावर केली, असे अखिलाडूवृत्तीचे आणि नकारात्मक प्रतिपादन बांगलादेशचा युवा वेगवान गोलंदाज शोरीफुल इस्लाम यांने पत्रकारांशी बोलताना केले. आपल्या या वक्तव्याने शोरीफुलने युवा विश्वचषक अंतिम लढत जिंकल्यावर बांगलादेश संघाने मैदानातच केलेल्या बीभस्त सेलेब्रेशनचे समर्थनच केले.

दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच पार पडलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हिंदुस्थानी युवा संघाला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. बांगलादेशने हिंदुस्थानवर 3 गडी राखून मात करत पहिल्यांदाच 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. मात्र, या सामन्यानंतर बांगलादेशी आणि हिंदुस्थानी खेळाडूंमध्ये झालेल्या राड्यामुळे बांगलादेशच्या विजयाला गालबोट लागले. आयसीसीने या प्रकरणी 3 बांगलादेशी तर 2 हिंदुस्थानी खेळाडूंना नकारात्मक गुण देण्याची (नियमांचा भंग केल्याप्रकरणी सुनावण्यात येणारी शिक्षा) शिक्षा सुनावली. या घटनेनंतर बांगलादेशचा गोलंदाज शोरिफुल इस्लामने पहिल्यांदा आपले मत मांडले आहे.

“याआधी आम्ही हिंदुस्थानविरुद्ध दोन रंगतदार सामने गमावले आहेत. 2018 मध्ये आशिया चषकातला उपांत्य फेरीत आणि 2019 मध्ये आशिया चषकाच्या अंतिम फेरीत आम्हाला टीम इंडियाकडून पराभव पत्करावा लागला. एक खेळाडू म्हणून तो पराभव मी शब्दांत सांगू शकणार नाही. हिंदुस्थानी संघानेही याआधी आम्हाला हरवल्यानंतर अशाच पद्धतीने सेलिब्रेशन केले होते, आम्ही त्यावेळी काही बोलू शकलो नाही. आम्ही फक्त हिंदुस्थानला अंतिम फेरीत हरवण्याची वाट पाहत होतो. ती संधी यंदाच्या युवा विश्वचषकात आली आणि आम्ही परतफेड केली”, अशी फुशारकीची भाषाही शोरीफुलने आपल्या स्पष्टीकरणात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या