बांगलादेशचं मरण उद्यावर, हिंदुस्थान विजयापासून चार पावलं दूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांगलादेशच्या फलंदाजांनी शनिवारी अतिशय चिवट फलंदाजी केली. मात्र तरीही हिंदुस्थानने त्यांचे 6 फलंदाज बाद करण्यात यश मिळविले. यजमान बांगलादेशने दुसऱया डावात 102 षटकांत 6 बाद 272 धावसंख्येपर्यंत मजल मारली. त्यांना विजयासाठी अजूनही 241 धावांची गरज आहे. हिंदुस्थानला विजयासाठी 4 बळी हवे आहेत. सामना संपूर्णपणे हिंदुस्थानच्या बाजूने झुकलेला असून बांगलादेशचं आजचं मरण उद्यावर गेलंय एवढंच या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याचं वर्णन करता येईल. चैथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार शाकिब अल हसन 40, तर मेहदी हसन 9 धावांवर खेळत होते.

पदार्पणाच्या कसोटीत झाकीर हसनचे शतक

हिंदुस्थानने 404 धावसंख्या उभारून बांगलादेशला 150 धावांत गुंडाळून पहिल्या डावात 254 धावांची मोठी आघाडी घेतली होती. हिंदुस्थानने दुसरा डाव 2 बाद 258 धावसंख्येवर घोषित करून बांगलादेशला विजयासाठी 513 धावांचे आव्हान दिले होते. कालच्या बिनबाद 42 धावसंख्येवरून बांगलादेशला नजमुल हुसैन (67) व झाकीर हसनने (100) शतकी सलामी दिली. झाकीरने पदार्पणातच शतक ठोकले. मात्र त्यानंतर ठरावीक अंतराने त्यांना धक्के बसत गेले आणि ते पराभवाच्या उंबरठय़ावर पोहोचले.