
वाय-फाय दुरुस्तीचा बहाणा करून चोरटय़ाने वृद्ध महिलेच्या बांगडय़ा लांबवल्याची घटना वांद्रे परिसरात घडली आहे. फसवणूकप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
महिला या कुटुंबीयांसोबत वांद्रे येथे राहतात. शनिवारी त्यांच्या मुलाचा निकाल असल्याने त्या शाळेत गेल्या होत्या. तेव्हा त्यांची सासू, मुलगी आणि पुतणी घरात होती. दुपारच्या सुमारास एकाने महिलेच्या घराची बेल वाजवली. त्याने आपण वाय-फाय तपासणीसाठी आल्याचे सांगून तो घरात शिरला. चोरटय़ाने महिलेच्या मुलीला वायफायबाबत विचारणा केली. तेव्हा मुलीने काहीच झाले नसल्याचे सांगितल्यावर चोरटय़ाने केबलचा बहाणा केला. दुरुस्ती करत असल्याचे भासवून चोरटय़ाने मुलीला तिच्या वडिलांबाबत विचारणा केली.
ओळखीचा असावा म्हणून मुलीने तिचे वडील कामानिमित्त कोकणात गेल्याचे सांगितले. त्याचा फायदा चोरटय़ाने घेतला. त्यानंतर चोरटा हा घरातून निघून गेला. स्पीड तपासायचा असल्याचा बहाणा करून तो पुन्हा घरात शिरला. वाय-फाय कुठे अशी विचारणा करून त्याने बटण चालू-बंद करण्यास सांगितले. तेव्हा तेथे महिलेच्या सासू बसल्या होत्या. चोरटय़ाची नजर महिलेच्या सासूच्या बांगडय़ांवर गेली. तपासणीचा बहाणा करून वाय-फाय चालू करण्यासाठी तांब्याच्या तारेऐवजी हातातील बांगडी मागितली. त्यावर विश्वास ठेवून महिलेच्या सासूने बांगडी दिली. त्यानंतर महिलेची पुतणी ही वाय-फाय बंद करून दुसऱया रूममध्ये गेली. त्याचा फायदा घेऊन चोरटयाने तेथून पळ काढला.
ओळखपत्र तपासून घरात घ्या
चोरटे हे कधी गॅस पंपनी तर कधी इंटरनेट पंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून दुपारी 12 ते 4 या वेळात ते घरात शिरतात. घरात कोणी नसल्याचे पाहून ते डल्ला मारतात. नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून संबंधित पंपन्या या मेसेजवरून जनजागृती करतात. एखादा जण हा पंपनीचे नाव सांगून घरात शिरत असल्यास त्याचे ओळखपत्र तपासूनच त्याना घरात घ्यावे. कामाव्यतिरिक्त घरातील इतर माहिती ते जाणून घेत असल्यास माहिती देऊ नये. तसेच जर घरात कोणी मोठी व्यक्ती नसल्यास लहान मुलांनी घरात कोणालाही घेऊ नये. जेणेकरून फसवणुकीचे प्रकार होणार नाहीत.





























































