
नागरिकत्व कायद्याविरोधात गुरुवारी देशभरात आंदोलनं झाली. दिल्ली, उत्तर प्रदेश, मंगळुरू येथील आंदोलनाला हिंसक वळण लागलं. कर्नाटकमधील बंगळुरू येथे देखील आंदोलकांनी या कायद्याचा विरोध करण्यासाठी मोर्चा काढला होता. मात्र बंगळुरूचे पोलीस उपायुक्तांनी यावर अत्यंत शांततेने तोडगा काढल्याने येथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
#WATCH Karnataka: DCP of Bengaluru(Central),Chetan Singh Rathore sings national anthem along with protesters present at the Town Hall in Bengaluru, when they were refusing to vacate the place. Protesters left peacefully after the national anthem was sung. #CitizenshipAmendmentAct pic.twitter.com/DLYsOw3UTP
— ANI (@ANI) December 19, 2019
बंगळुरूमधील टाऊन हॉलजवळ नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करण्यासाठी शेकडोने नागरिक जमा झाले होते. आंदोलनकर्ते सरकारविरोधात, कायद्याविरोधात घोषणा देत होते. मात्र यावेळी बंगळुरू मध्यचे उपायुक्त चेतन सिंग राठोड यांनी जमावाला मार्गदर्शन केलं. त्यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले व कशाप्रकारे समाजकंटकं अशा आंदोलनांचा फायदा घेतात हे समजावले. त्यानंतर राठोड यांनी राष्ट्रगीत गायले. त्यानंतर सर्व आंदोलनकर्ते तेथून परत गेले.
‘जेव्हा अनेक लोकं एकत्रं येतात तेव्हा मॉब मेंटॅलिटी तयार होते. या मॉब मेंटॅलिटीचा काही समाजकंटक फायदा घेतात व हिंसाचार घडवतात. हिंसाचार ते घडवतात पण त्याचा फटका सर्वांनाच बसतो. त्यामुळे जर माझ्यावर विश्वास असेल तर मी एक गाणं गाईन व ते गाताना माझे सर्व देशवासी माझ्यासोबत असतील’, असे आवाहन करत राठोड यांनी राष्ट्रगीत गाण्यास सुरुवात केली. त्यांच्यासोबत आंदोलनकर्त्यांनी देखील राष्ट्रगीत गाऊन तेथून ते निघून गेले.



























































