नोटाबंदीचा ७० हजार बँक कर्मचाऱ्यानाही फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

नोटाबंदीच्या काळात बँक कर्मचाऱ्यावर कामाचा प्रचंड ताण होता. दिवसरात्र काम केलेल्या कर्मचाऱ्याना ओव्हरटाइम देण्यात आला, मात्र देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँकेने (एसबीआय) हा ओव्हरटाइम परत करा असे आदेश तब्बल ७० हजार कर्मचाऱ्याना दिले आहेत. नोटाबंदीचा फटका जनतेला बसला होताच, आता बँक कर्मचाऱ्यानाही बसला आहे.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून बाद करून नोटाबंदी जाहीर केली. नोटाबंदीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. बँकांसमोर लांबच लांब रांगा लागल्या. देशात आर्थिक अराजकता माजली होती. या काळात बँक कर्मचाऱ्यावर कामाचा ताण वाढला. जुन्या नोटा घेणे, नवीन चलनात बदलून देणे, बदलत्या नियमांनुसार काम करणे आणि ग्राहकांना समजावून सांगणे आदी कामे वाढली. नोटाबंदीच्या काळातील जादा कामाचा मोबदला द्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यानी केली होती. त्यानुसार कर्मचाऱ्याना ओव्हरटाइम दिला गेला, मात्र आता स्टेट बँकेने आपल्या ७० हजार कर्मचाऱ्याकडे ओव्हरटाइमचे पैसे परत मागितले आहेत.

विलीनीकरणाचा मुद्दा

 स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ बिकानेर ऍण्ड जयपूर या बँका एप्रिल २०१७ मध्ये स्टेट बँकेत विलीन करण्यात आल्या.

 नोटाबंदीनंतर या बँका विलीन केल्या. त्यामुळे ओव्हरटाइम त्या संबंधित बँकेनेच आपल्या कर्मचाऱयांना द्यायला हवा होता. तसेच स्टेट बँकेशी संलग्न बँकांनाही त्यांच्या मुख्य बँकेकडूनच ओव्हरटाइम द्यावा. स्टेट बँकेने दिलेला ओव्हरटाइम ७० हजार कर्मचाऱयांनी परत करावा, असे पत्र सर्व विभागीय मुख्यालयांना पाठविले आहे.