बँक ऑफ महाराष्ट्रचा धक्कादायक निर्णय, रवींद्र मराठे यांचे सर्व अधिकार काढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

कर्ज गैरव्यवहारात झालेल्या अटकेपाठोपाठ बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांना आज दुसरा धक्का बसला. मराठे यांच्यासह बँकेचे कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता यांचे सर्व अधिकार संचालक मंडळाने आज काढून घेतले. बँकेच्या संचालक मंडळाच्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येऊन लगेचच तो ‘सेबी’ला कळविण्यात आला.

मराठे आणि गुप्ता यांचे अधिकार काढल्यानंतर सध्या त्यांना कोणतेही अधिकार नाहीत. बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या ‘डीएसकेडीएल’ या कंपनीला नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने रवींद्र मराठे, आर. के. गुप्ता यांच्यासह बँकेचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत, तत्कालीन विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांना अटक केली होती. मराठे यांची जामिनावर सुटका होताच केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आज बँकेच्या पुण्यातील ‘लोकमंगल’ या मुख्यालयात ही तातडीची बैठक झाली.

संचालक मंडळाच्या या बैठकीसाठी केंद्र सरकारच्या दोन प्रतिनिधींना पाचारण केले होते. त्यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत मराठे आणि गुप्ता यांच्याबद्दल निर्णय घेण्यात आला. दोघांचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले.
महाराष्ट्र बँकेच्या संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. वरिष्ठ अधिकाऱयांना या बैठकीचा थांगपत्ता लागू देण्यात आला नव्हता. मराठे आणि गुप्ता यांचे अधिकार काढून घेण्याच्या निर्णयाने बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. अधिकार काढून घेणे हा चौकशीचा भाग असून, ही प्रचलित पद्धत आहे. बँकेने हे अधिकार काढून घेतल्यानंतर तूर्त तरी ते कोणाला दिले, याबद्दल कोणतीही स्पष्टता दिली नाही. हा निर्णय ‘सेबी’ आणि मुंबई शेअर बाजारला कळविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गुप्ता, मुहनोत, देशपांडे यांना जामीन मंजूर
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके यांना बेकायदा कर्ज दिल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले बँक ऑफ महाराष्ट्रच्या तीन अधिकाऱयांना विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी जामीन मंजूर केला. प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता, माजी अध्यक्ष सुशील मुहनोत, विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांना तपासात सहकार्य करण्यासह इतर अटींकर न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. डीएसके यांचे चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) सुनील मधुकर घाटपांडे, डीएसके ग्रुपचे मुख्य अभियंता राजीक दुल्लभदास नेकसेकर यांच्या जामिनावर सोमकारी निकाल होणार आहे. घाटपांडे यांच्यातर्फे ऍड. एस. के. जैन, नेकसेकर यांच्यातर्फे ऍड. रोहन नहार यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे.

– सरकारी सेवेतील व्यक्तीला अटक होऊन दोन दिवसांपेक्षा अधिक काळ पोलीस कोठडी सुनावल्यास त्या व्यक्तीवर अशी कारवाई करण्यात येते. या नियमाला अनुसरून ही कारवाई झाली असल्याचे सांगण्यात येते. त्यांची चौकशी झाल्यानंतर पुढील निर्णय होणार आहे.