आजपासून तीन दिवस खडखडाट! बँक कर्मचारी पगारवाढीसाठी संपावर

800

सरकारसोबत पगारवाढीची बोलणी फिस्कटल्यामुळे सर्व बँक कर्मचारी संघटनांनी दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी रोजी बँका बंद राहणार असून 2 फेब्रुवारी रोजी रविवार आहे. त्यामुळे तीन दिवस खडखडाट राहणार आहे. पगारवाढीची मागणी मान्य न झाल्यास एप्रिलमध्ये बेमुदत बंद करण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे.

2017 पासून बँक कर्मचारी पगारवाढीची मागणी करत आहेत, मात्र सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले. सर्व बँक कर्मचारी संघटनांनी संपावर जाण्याचा इशारा दिल्यानंतर खडबडून जाग असलेल्या केंद्र सरकारने बोलणी सुरू केली. मुख्य श्रम आयुक्तांनी इंडियन बँक्स असोसिएशनला बँक कर्मचारी संघटनांशी पगारवाढीच्या मुद्दय़ावर चर्चा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आज मुंबईत बैठक झाली, मात्र बँक्स असोसिएशनने पगारवाढीचा प्रस्ताव दिला नाही. त्यामुळे बोलणी फिस्कटली आणि बँक कर्मचारी संघटनांनी दोन दिवसांच्या संपावर जात असल्याचे जाहीर केले. 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी असे दोन दिवस 10 लाख कर्मचारी तसेच अधिकारी संपावर जाणार असल्यामुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत. 2 फेब्रुवारीला रविवार आल्यामुळे सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत.

दोन दिवसांचा संप झाल्यानंतर पुन्हा पगारवाढीच्या मुद्दय़ावर सरकारशी बोलणी करण्यात येणार आहेत. त्यातही तोडगा न निघाल्यास मार्चमध्ये 11, 12 आणि 13 रोजी तीन दिवसांचा बंद पुकारण्यात येणार आहे. या बंदनंतरही सरकारने मागण्या मान्य न केल्यास 1 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा बँक कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या