बारामतीत गोळीबार प्रकरणी पाच जणांना अटक, दहशत माजविण्यासाठी केला होता गोळीबार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारामतीत एकावर गोळीबार करून पसार झालेल्या सराईतासह पाच जणांना पुणे ग्रामिण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. किरकोळ वादातून झालेल्या वादानंतर दहशत माजविण्यासाठी सराईत आणि साथीदाराने हा गोळीबार केल्याचे चौकशीत समोर आले आहे. पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके उपस्थित होते.

शुभम विकास राजपुरे (वय 24, रा. राजपुरेवाडी, मुर्टी मोडवे, बारामती), तुषार चंद्रकात भोसले (वय 22, रा. रूई पाटी, बारामती), तेजस रतीलाल कर्चे (वय 21, रा. सूर्यनगरी, एमआयडीसी, बारामती), विक्रम लालासाहेब बोबडे (वय 26), सूरज राजू काशीद (वय 27 दोघे रा. रुई सावळ, बारामती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 3 नोव्हेंबर रोजी बारामती परिसरातील जळोची रस्ता परिसरात ऋत्विक जीवन मुळीक रस्ता ओलांडत होता. त्यावेळी आरोपी तुषार भोसले दुचाकीवरून जात होता.

दुचाकीने हुल दिल्याने मुळीक आणि भोसले यांच्यात किरकोळ वाद झाला. त्या वेळी भोसले याने मुळीक याला मारहाण करून तेथून पसार झाला. काही वेळानंतर भोसले आणि त्याचा साथीदार काशीद, राजपुरे, कर्चे, बोबडे तेथे आले. त्यानंतर आरोपींनी मुळीक, त्यांचे मित्र गणेश जाधव, अतुल भोलाशंकर यांना मारहाण केली. त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर पिस्तुलातून जाधव यांच्यावर गोळीबार केला.

या घटनेत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आरोपींना पकडण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि बारामती पोलिसांच्या पथकाने पाच जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांपैकी राजपुरे हा मुख्य आरोपी असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.