बारामतीमध्ये चोरट्यांचा हैदोस, शिवाजी चौकातील पाच दुकाने गॅस कटरने तोडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
robbery

पुणे-बारामती शहरातील वर्दळीच्या शिवाजी चौकातील पाच दुकाने चोरट्यांनी कटरच्या सहायाने फोडून रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दुकानांच्या परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झाला असून बारामती पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

शिवाजी चौकातील सुख शांती अपार्टमेंट मधील ही पाच दुकाने आहेत. आईस्क्रीम पार्लर, चपलांचे दुकान, डिझाईनिंग आणि कलर पेंटची पाच दुकाने अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गॅस कटरच्या सहायाने फोडली. त्यानंतर या दुकानात असणाऱ्या गल्ल्यातील रोख रक्कम या चोरट्यांनी चोरून नेली. नेमकी किती रक्कम चोरीला गेली याची माहिती मात्र अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही.

बारामती शहरात दिवस-रात्र पोलिसांची गस्त सुरू असतानाही चोरट्यांनी अशाप्रकारे वर्दळीच्या ठिकाणची ही पाच दुकाने फोडून पोलिसांना जणू आव्हानच दिले आहे. बारामती पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.