टीआरपी प्रकरण – पार्थ दासगुप्ताला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीआरपी प्रकरणात क्राईम ब्रँचने अटक केलेले बार्कचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ताला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी पार्थच्या पत्नीच्या बँक लॉकरमधून 48 लाख रुपयाचे दागिने जप्त केले आहेत.

बार्कचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ताला गेल्या आठवडय़ात क्राईम ब्रँचने अटक केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी पार्थच्या घरातून लॅपटॉप, मोबाईल, टॅग व्ह्युअरचे मनगटी घडय़ाळ, 59 बांगडय़ा, 12 नेकलेस जप्त केले होते. क्राइम ब्रँच कोठडीत असताना पोलिसांनी पार्थची चौकशी केली. तेव्हा टीआरपीमध्ये फेरफार करून ‘रिपब्लिक टीव्ही’ला 1 नंबर वर आणण्यासाठी पार्थला अर्णब गोस्वामीकडून लाखो रुपये दिले गेले होते. त्या पैशातून पार्थने दागिने खरेदी केले होते. ते दागिने पार्थने त्याच्या पत्नीच्या नावावर असलेल्या एका बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. पोलिसांनी लॉकरमधून 1313.97 ग्रॅम दागिने जप्त केले. जप्त केलेल्या दागिन्यांची किंमत 48 लाख रुपये इतकी आहे.

पार्थच्या क्राइम ब्रँच कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला आज न्यायालयात हजर केले. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पार्थच्या जामीन अर्जावर 1 जानेवारीला सुनावणी होणार आहे.