
सामना प्रतिनिधी । मुंबई
टेन्शन लेने का नही, टेन्शन देने का’ म्हणत पेगवर पेग रिचवणाऱया तळीरामांना आता बीअरच्या दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा पर्यावरणावर गंभीर परिणाम झाल्याने बीअरच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या बार्ली पिकाचे उत्पादन जगभरात झपाटय़ाने घटू लागले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत जग बीअरच्या दुष्काळाच्या सावटाखाली असणार आहे.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे प्रत्येक वर्षी जगभरात कुठे ना कुठे दुष्काळ पडत आहे. तसेच उष्णतेचे प्रमाण वाढल्याने बार्ली पिकाच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याचे ब्रिटनमधील ‘नेचर प्लॅण्टस्’च्या वैज्ञानिक जर्नलमधील एका संशोधन अहवालात स्पष्ट केले आहे. बार्लीचे उत्पादन कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम बीअरच्या उत्पादनावर होणार आहे.
जगभरात सर्वाधिक सेवन केले जाणारे मद्य म्हणून बीअरकडे पाहिले जाते, मात्र बार्लीचे उत्पादन कमी होऊन दुष्काळाचे सावट आल्यास बीअरच्या किमती वाढणार आहेत. त्यामुळे बीअरचे नंबर वन पद धोक्यात आले आहे.
– लोकांनी जास्त बीअर प्यावी हा आमचा हेतू नाही, मात्र ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम कोणत्या बाबींवर होत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे अहवालाचे सहलेखक डॅबो गुआन यांनी सांगितले. ते युनायटेड किंगडममधील नॉर्विच येथील उत्तर अँगलिया विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र्ा विषयाचे प्राध्यापक आहेत.

























































