
मरीन ड्राईव्ह परिसरात रस्ता ओलांडताना होणारे प्रवाशांचे अपघात टाळण्यासाठी दुभाजकांमध्ये बॅरियर्स बसविण्यात येणार आहेत. दुभाजकांमध्ये बॅरियर्सवरून रस्ता ओलांडणे शक्य होणार नाही, मात्र समुद्राच्या दिशेने पाहताना दृश्यमानता कायम राहील, अशा पद्धतीने त्यांची उंची कमी-जास्त ठेवण्यात येणार आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी मरीन ड्राईव्ह परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा ‘हमखास अपघात प्रवण क्षेत्रां’चे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणामध्ये निर्देशित ठिकाणी पादचाऱयांकडून रस्ता ओलांडण्याचे प्रकार रोखता यावे म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनीदेखील महानगरपालिका प्रशासनाला विनंती केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘ए’ विभागाच्या हद्दीतील मरीन ड्राईव्ह भागात रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये फॅब्रिकेटिंग आणि रेलिंग बॅरियर्स लावण्यासाठीची प्रक्रिया विभाग कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे. अपघातप्रवण भागात हे बॅरियर्स लावण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त शिवदास गुरव यांनी दिली.
























































