चेहऱ्याची चमक काय़म ठेवायची आहे; तर या स्किन केअर टिप्स नक्की फॉलो करा

मे महिना म्हटला की लग्नसराईचे दिवस सुरू होतात. यादरम्यान नवरदेव आणि नवऱ्यामुलीकडेच साऱ्य़ांचे लक्ष असते. लग्नाच्या दिवशी आपली त्वचा नैसर्गिकरित्या चमकावी अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. यासाठी मुली आपल्या स्किन केअर ट्रिटमेंटसाठी पार्लरमध्ये जातात. जेणेकरून या ट्रिटमेंटचा उपयोग तिला लग्नात आणि लग्नानंतर देखील होईल. अशी तिची ईच्छा असते. लग्नसमारंभात थकवा येणे स्वाभाविक आहे, अशा परिस्थितीत मुलींच्या चेहऱ्यावरील चमक कमी होते. लग्नाच्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर भरपूर मेकअप केला जातो, त्यानंतर त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये पुढील टीप्स समावेश करून तुम्ही जादुई फायदे मिळवू शकता.

1. मेकअपमधून ब्रेक घ्या
लग्नादरम्यान, वधूच्या चेहऱ्यावर भरपूर मेकअप लावला जातो. त्यामुळे त्वचा ड्राय होते. लग्नानंतर तुम्ही तुमच्या त्वचेला काही काळ मेकअपपासून ब्रेक द्यावा. कमीतकमी एका आठवड्यासाठी, सर्व प्रकारच्या मेकअप उत्पादनांपासून पूर्णपणे दूर राहा. सतत मेकअपचा वापर केल्याने चेहऱा लवकर खराब होण्याची शक्यता असते. मेकअपमुळे तुमच्या त्वचेला श्वास घेण्याची संधी मिळत नाही आणि अनेकदा तुमचे छिद्र देखील बंद होतात ज्यामुळे त्वचेच्या इतर अनेक समस्या उद्भवतात. मेकअपमधून ब्रेक घेतल्याने तुमच्या त्वचेला भरपूर ऑक्सिजन मिळण्याची शक्यता असते.

2. पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे
त्वचा आतून चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी, आपण आपल्या जीवनशैलीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जर तुम्ही रात्री उशिरा झोपत असाल तर तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होऊ शकतात. त्यामुळे तुमची झोपेची आणि उठण्याची वेळ निश्चित करणे महत्त्वाचे आहे. पुरेशी झोप घेतल्याने नैराश्य आणि पोस्टट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता देखील कमी होते. तुम्ही पुरेशी झोप घेतल्यास दुसऱ्या दिवशी एक चांगला उत्साह निर्माण होऊन काम करण्यासाठी चांगली ऊर्जा निर्माण होते. रात्रीच्या झोपेने आरोग्याच्या समस्या नक्कीच दूर होऊ शकतात.

3. हायड्रेटेड रहा
पाणी हा सर्वात महत्वाचा पोषणघटक आहे. चमकणाऱ्या त्वचेसाठी, तुम्ही स्वतःला नेहमी हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत नारळ पाणी पिऊ शकता. दिवसाच्या सुरुवातीला चहा किंवा कॉफीऐवजी नारळ पाणी प्या. शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी, विविध द्रावांचा समतोल राखण्यासाठी पाणी गरजेचं आहे. केस, त्वचा, नखे यांच्यातील पेशींची बांधणी टिकवून ठेवण्यासाठी पाणी आवश्यक आहे.

4. आरोग्यदायी गोष्टी खा
लग्नसमारंभात तुम्ही आधीच भरपूर तेलकट आणि फास्ट फू़ड खाल्लेले असते, त्यामुळे आता तुम्ही तुमच्या शरीराला डिटॉक्स करणे महत्त्वाचे आहे. यासोबतच शक्यतो साधे घरगुती अन्न खावे. यासोबतच उन्हाळ्यात रोज दही किंवा रायत्याचा आहारात समावेश करा. उन्हाळ्यात कमी चरबीयुक्त, थंड, हलके आणि पौष्टिक असे पदार्थ खावे. या काळात ताजी हंगामी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. सकाळी चांगला हायड्रेटेड आणि पौष्टिक नाश्ता करावा जेणेकरून पुढील काही तास थकवा जाणवणार नाही.