
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 क्रिकेट मालिकेत अपयशी ठरल्यामुळे लोकेश राहुल सध्या टीकेचा धनी ठरला आहे. मात्र ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहली आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी मात्र राहुलसाठी बॅटिंग केलीय. केवळ तीन सामन्यांतील अपयशामुळे राहुलला डावलता येणार नाही. आजही तोच आमचा सर्वोत्तम फलंदाज आहे, अशा शब्दांत कोहली व राठोड यांनी राहुलला समर्थन दिले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत लोकेश राहुलची तीन लढतींत 1, 0, 0 अशी कामगिरी आहे. त्यातच दोन लढतींत पराभव झाल्याने ‘टीम इंडिया’वर मालिका गमावण्याचे संकट उभे आहे. मात्र लोकेश राहुलच ‘टीम इंडिया’चा सर्वोत्तम फलंदाज असल्याने विराट कोहली व विक्रम राठोड यांनी सांगितले. प्रत्येक खेळाडूला खराब काळाचा सामना करावाच लागतो. त्याने 40-60च्या सरासरीने आणि 145च्या स्ट्राइक रेटने धावा केलेल्या आहेत. त्यामुळे केवळ तीन सामन्यांतील अपयशामुळे राहुल खराब खेळाडू ठरू शकत नाही. एखादी चांगली खेळी पुन्हा त्याला धावांच्या ट्रकवर घेऊन येईल, असा विश्वासही कर्णधार व प्रशिक्षकांनी बोलून दाखवला.
































































