
दिल्लीत 2008 साली झालेल्या ‘बाटला हाऊस एन्काऊंटर’ प्रकरणी इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी आरीज खान याला दोषी ठरविण्यात आले आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टाने सोमवारी या प्रकरणात आरीज खानला फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने या प्रकरणाला अतिदुर्मिळ प्रकरण म्हटले आहे.
बाटला हाऊस चकमकीदरम्यान शौर्यचक्र विजेते पोलीस अधिकारी मोहन चंद शर्मा दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार व मुख्य आरोपींपैकी एक असलेला आरिज खान फरार झाला होता. 2018 साली त्याला नेपाळमधून अटक करण्यात यश मिळाले होते. या प्रकरणात न्यायालयाने कलम 302, 307 आणि आर्म्स ऍक्टअंतर्गत दोषी ठरवले असून फाशीची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीबरोबर अहमदाबाद, उत्तर प्रदेश व जयपूरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतही आरीज खानचे नाव समोर आले होते. याशिवाय 2007 साली लखनऊ न्यायालयामध्ये, तसेच वाराणसीत झालेल्या स्फोटातही आरिजचा हात समोर आला होता.
काय आहे बाटला हाऊस प्रकरण ?
- दिल्लीतील बाटला हाऊसमध्ये 19 सप्टेंबर 2008 च्या सकाळी एन्काऊंटर झाला होता. या घटनेच्या एका आठवडय़ापूर्वी 13 सप्टेंबर 2008 ला दिल्लीत 5 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. 50 मिनिटांत झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात 39 जणांचा मृत्यू झाला होता. तर 130 हून अधिक जण जखमी झाले होते.
- दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, तेव्हा ते बाटला हाऊसमध्ये एल-18 नंबर इमारतीच्या तिसऱया मजल्यावर पोहचले. तिथे इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांना कंठस्तान घालण्यत आले. तर, दोघांना अटक आणि एक फरार झाला होता.




























































