
हिंदुस्थानी क्रिकेट संघ येत्या जूनमध्ये पूर्ण ताकदीनिशी आयर्लंड दौऱ्यावर जाणार असून, दोन्ही संघांदरम्यान दोन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक बीसीसीआयने शनिवारी जाहीर केले.
टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ही ‘टीम इंडिया’ची पहिली मालिका ठरणार आहे. ८ मार्चला अहमदाबाद येथे न्यूझीलंडवर ९६ धावांनी विजय मिळवत हिंदुस्थानने किताब पटकावला होता.
आठ वर्षांत चौथा दौरा
‘टीम इंडिया’ने २०१८, २०२२ आणि २०२३ या वर्षांत आयर्लंडचा दौरा केला असून, हा आठ वर्षांतला चौथा दौरा असेल. आयलँडसाठीही २०२६ हे व्यस्त वर्ष असून, त्यांना न्यूझीलंडविरुद्ध एकमेव कसोटी आणि अफगाणिस्तानविरुद्ध पाच एकदिवसीय सामने खेळायचे आहेत.
आयर्लंडविरुद्ध हिंदुस्थान अपराजित
हिंदुस्थान आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत तीन टी २० मालिका झाल्या आहेत. २०१८ आणि २०२२ मध्ये हिंदुस्थानने २-० अशी क्लीन स्वीप नोंदवली होती. २०२३ मधील तीन सामन्यांच्या मालिकेतही हिंदुस्थानने २-० अशीच आघाडी घेतली होती, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. या सर्व मालिका आयर्लंडमध्येच खेळल्या गेल्या.
अफगाणिस्तानविरुद्धही मालिका
आयपीएलनंतर हिंदुस्थानी संघ जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्धही मालिका खेळणार आहे. ६ जूनपासून एकमेव कसोटीने मालिकेला सुरुवात होईल. त्यानंतर १४ जून (धर्मशाळा), १७ जून (लखनौ) आणि २० जून (चेन्नई) येथे तीन एकदिवसीय सामने होतील.
इंग्लंड दौऱ्याचीही तयारी
याचवर्षी हिंदुस्थानी संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांदरम्यान पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. जुलै महिन्यात ही मालिका पार पडणार आहे.



























































