
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 हिंदुस्थानी जवानांना बलिदान द्यावे लागले. तो हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी आता क्रिकेटही नको. आयसीसी विश्वचषकामध्ये आम्ही पाकिस्तानी संघाविरुद्ध खेळलो तर तो शहीद जवानांच्या हौतात्म्याचा अवमानच ठरेल. म्हणून आयसीसीने दहशतवादसमर्थक पाकला स्पर्धेतून बाहेर काढावे, अन्यथा टीम इंडियाला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल, असा इशारा हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) पत्राद्वारे देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात उद्या, शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत केंद्रीय, गृह, क्रीडा आणि संरक्षण मंत्र्यांशी बोलून बीसीसीआय वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळावे की नाही याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहे.
आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांना बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी हिंदुस्थानी जनतेच्या तीव्र भावनांबद्दल पत्र लिहीत वरील इशारा दिला आहे. हे पत्र थेट शशांक मनोहर यांना पाठवायचे की अन्य कुणाला याचा निर्णय प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय घेणार आहेत. पाकिस्तानशी क्रीडा क्षेत्रातही संबंध ठेवू नये अशी हिंदुस्थानी जनतेची तीव्र भावना आहे. हिंदुस्थान दहशतवादाबाबत कोणतीही तडजोड करू इच्छित नाही. त्यामुळे यंदाच्या आयसीसी विश्वचषकामध्ये टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध खेळणे हा आमच्या शहीद जवानांचा आणि हिंदुस्थानी जनतेच्या भावनांचा अपमान ठरेल याची नोंद आपण घ्यावी, असे जोहरी यांनी बीसीसीआयच्या ई-मेलमध्ये नमूद केले आहे.
बोर्डानेही पाकडय़ांची छायाचित्रे हटवली
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बीसीसीआयने आपल्या मुंबईतील मुख्यालयातून पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित छायाचित्रे आणि स्मृतिचिन्हे हटवली आहेत. क्रिकेट क्लब ऑफ इंडियासह अनेक राज्य क्रिकेट संघांनी आपापल्या कार्यालयांमधून पाकिस्तानशी संबंधित छायाचित्रे हटवल्यानंतर बीसीसीआयने हे पाऊल उचलले आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीएने)ने देखील नागपूर स्टेडियममधून पाकशी संबंधित छायाचित्रे काढून टाकली आहेत. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्याची वाढती मागणी औचित्याची आणि योग्य असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केली.
सरकारची परवानगी नसेल तर हिंदुस्थान-पाक सामना होणार नाही
हिंदुस्थानी जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारने आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानशी खेळण्यास परवानगी नाकारली तर हिंदुस्थान -पाकिस्तान लढत होणार नाही. मात्र 16 जूनला होणाऱ्या इंडो-पाक लढतीतून टीम इंडियाने माघार घेतल्यास पाकिस्तानला पूर्ण 2 गुण मिळतील आणि नुकसान हिंदुस्थानचेच होईल, असे मत बीसीसीयायच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.




























































