खेळाडूंच्या ‘सॅलरी’ला लागणार ब्रेक? बीसीसीआय म्हणते…

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या 2 महिन्यात क्रिकेटचा एकही सामना झालेला नाही. यामुळे जगभरातील क्रीडा मंडळांना प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. ऑस्ट्रेलियासह अनेक क्रिकेट मंडळांनी खेळाडूंच्या पगारात कपात केली आहे. आर्थिक दृष्टया बलाढ्य असणाऱ्या बीसीसीआयनेही याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

हिंदुस्थानचा संघही ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार होता तसेच आयपीएल स्पर्धाही अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्याने बीसीसीआयलाही नुकसान होत आहे. असे असले तरी बीसीसीआयने मात्र खेळाडूंच्या पगारात कोणतीही कपात केली जाणार नाही असा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी खेळाडूंच्या पगारात कपात होणार नाही. मंडळाला होत असलेल्या नुकसानीची भरपाई अन्य मार्गाने केली जाईल, असे म्हंटले आहे. त्यामुळे खेळाडूंना दिलासा मिळाला आहे.

आयपीएलचा 13 वा हंगाम अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्याने बीसीसीआयलाही नुकसान होत आहे. तसेच आयपीएल रद्द करावे लागल्यास बीसीसीआयला जळपास 4 हजार कोटींची आर्थिक नुकसान सोसावे लागेल, असे धुमाळ यांनी सांगितले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि इतर मंडळाप्रमाणे बीसीसीआय देखील पगार कपात करणार का असा प्रश्न होता. मात्र धुमाळ यांनी यास नकार दिला आहे. तसेच या आर्थिक संकटावर आम्ही नियंत्रण मिळवू असेही ते म्हणाले.

कर्मचाऱ्यांच्या खर्चाला कात्री
खेळाडूंच्या पगारात कपात केली जाणार नसली तरी कर्मचारी आणि अधिकारी वर्गाच्या खर्चात कपात करण्यात येईल, असे धुमाळ म्हणाले. याबाबत काम सुरू असून ज्या-ज्या ठिकाणी खर्च कमी करता येईल जसे की कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचा प्रवास, त्यांचे निवासस्थान यावर निर्णय घेण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या