कोरोना टाळाल तरच इंग्लंड दौरा खेळाल! ‘बीसीसीआय’कडून क्रिकेटपटूंना सूचना

इंग्लंड दौऱयासाठी ‘टीम इंडिया’त निवड झालेल्या खेळाडूंना हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक सूचना दिल्या आहेत. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी कोणाला कोरोनाची लागण झाल्यास त्याला संघातून बाहेर केले जाईल. मुंबईत बायो-बबलमध्ये येईपर्यंत सर्व क्रिकेटपटूंनी खबरदारी घ्यावी व स्वतःला कोरोना होणार यासाठी सावध राहावे. शक्य तो आतापासूनच विलगीकरणात राहावे, असे ‘बीसीसीआय’कडून स्पष्ट करण्यात आले आहे. ‘आयपीएल’च्या बायो-बबलचा फुगा चारच आठवडय़ांत फुटल्यामुळे ‘बीसीसीआय’ने इंग्लंड दौऱयापूर्वी अधिक खबरदारी घेतली आहे.

2 जूनला इंग्लंडला रवाना होणार

मुंबईत आठवडाभर बायो-बबलमध्ये राहिल्यानंतर ‘टीम इंडिया’ 2 जूनला इंग्लंडला रवाना होईल. इंग्लंडमध्ये गेल्यावर तेथेही हिंदुस्थानी खेळाडूंना 10 दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. मात्र, या काळात खेळाडूंना सराव करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कारण हे सर्व खेळाडू एका बायो-बबलमधून दुसऱया बायो-बबलमध्ये थेट प्रवेश करणार आहेत. ‘टीम इंडिया’साठी स्पेशल चार्टर्ड प्लेन पाठविले जाणार आहे.

खेळाडू घेणार कोविशिल्ड लस

इंग्लंड दौऱयावर जाणाऱया क्रिकेटपटूंनी कोविशिल्ड लसीचाच पहिला डोस घ्यावा, असे ‘बीसीसीआय’कडून स्पष्ट करण्यात आले आहे. कारण कोविशिल्डचा दुसरा डोस इंग्लंडमध्ये उपलब्ध करण्यासंदर्भात ‘बीसीसीआय’ची इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डासोबत (ईसीबी) चर्चा सुरू आहे. कर्णधार विराट कोहलीसह अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा व उमेश यादव या खेळाडूंनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. इतर खेळाडूंनी लवकर कोरोना लसीचा पहिला डोस घ्यावा. काही अडचण असल्यास ‘बीसीसीआय’कडून तुम्हाला लस उपलब्ध करून दिली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

साडेतीन महिन्यांचा इंग्लंड दौरा

हिंदुस्थान व न्यूझीलंडदरम्यान 18 ते 22 जूनदरम्यान साऊथम्पटन येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार आहे. त्यानंतर जवळपास दीड महिना ‘टीम इंडिया’ इंग्लंडमध्येच राहणार आहे. मग 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेस प्रारंभ होईल. ही पाच सामन्यांची कसोटी मालिका 14 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. याचाच अर्थ ‘टीम इंडिया’ इंग्लंड दौऱयावर तीन महिन्यांहून अधिक काळ राहणार आहे.

‘आयपीएल’च्या बायो-बबलचा धडा

कोरोनाने ‘आयपीएल’च्या बायो-बबलचा फुगा पह्डल्यामुळे ही टी-20 क्रिकेट स्पर्धा 29 सामन्यांनंतर स्थगित करावी लागली. त्यामुळे या घटनेतून धडा घेत हिंदुस्थान-न्यूझीलंड दरम्यान होणाऱया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी मोठी खबरदारी घेतली जात आहे. ‘बीसीसीआय’ आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड यांनी ‘आयसीसी’ने कोरोना नियमांचे कडेकोट पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. इंग्लंड दौऱयावर येण्यापूर्वी एकही खेळाडू पिंवा सपोर्ट स्टाफ यांना कोरोनाची लक्षणे असणार नाहीत याची खातरजमा करायची आहे. आयोजक आणि भागीदार यांनी या अंतिम फेरीसाठी चांगलीच कंबर कसली आहे.

खेळाडू 19 मे रोजी बायो-बबलमध्ये येणार

मुंबईमध्ये 19 मे रोजी हिंदुस्थानी क्रिकेटपटू, त्यांचे कुटुंबीय आणि सपोर्ट स्टाफ बायो-बबलमध्ये प्रवेश करतील. पहिल्याच दिवशी या सर्वांची कोरोना चाचणी होईल. इंग्लंड दौऱयासाठी निवड झालेले 20 क्रिकेटपटू हे वेगवेगळय़ा राज्यांतील आहेत. प्रत्येक राज्यात कोरोनाची वेगवेगळी परिस्थिती आहे. त्यामुळेच या सर्व खेळाडूंना आठवडाभर ‘बीसीसीआय’च्या बायो-बबलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत आल्यानंतर दुर्दैवाने कोणी खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्यासाठी वेगळे चार्टर्ड फ्लाइट पाठविले जाणार नाही. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी प्रत्येकाच्या दोन कोरोना टेस्ट निगेटिव्ह यायला हव्यात. क्रिकेटपटूंनी खासगी गाडी पिंवा विमानानेच मुंबईत दाखल व्हावे, अशी सूचनाही ‘बीसीसीआय’ने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या