दोन हजारांच्या लाचप्रकरणी बीडीओला अटक; दक्षिण सोलापूरमध्ये लाचलुचपतची कारवाई

दक्षिण सोलापूर पंचायत समितीतील विस्तार अधिकारी (बीडीओ) याला ठेकेदाराकडून दोन हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. सायंकाळी कार्यालय बंद होत असताना, पंचायत समितीमध्येच कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. संदिप सुधाकर खरबस असे अटक करण्यात आलेल्या बीडीओचे नाव आहे.

तक्रारदार ठेकेदार याने दक्षिण सोलापुरातील मौजे येळेगावमध्ये सिमेंट काँक्रीटचे रोड केले आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर एक लाख रुपयांचे बिल येणेकामी मूल्यांकन पत्र मिळण्यासाठी पंचायत समिती, दक्षिण सोलापूर यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. सदरचे बिल ग्रामपंचायत बँक खात्यातून काढण्यासाठी आणि मूल्यांकन प्रमाणपत्रासाठी बीडीओ संदीप सुधाकर खरबस याने ठेकेदाराकडे 2 हजार रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. सायंकाळी विस्तार अधिकारी संदिप खरबस याला कार्यालयातच 2 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. खरबस याला अटक करण्यात आली असून, सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक शैलेश व त्यांच्या पथकाने केली आहे.