
चक्रीवादळ वादळ ‘मोंथा’ आंध्र प्रदेश किनाऱ्याकडे सरकत आहे आणि पुढील 24 तासांत, 28 ऑक्टोबरच्या रात्री, आंध्र प्रदेश किनाऱ्यावरील मछलीपट्टनम आणि कलिंगपट्टनम दरम्यान काकीनाडाजवळ धडकण्याची शक्यता आहे. सोमवारी रात्री भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या ताज्या अहवालानुसार, नैऋत्य बंगालच्या उपसागरावर असलेले ‘मोंथा’ चक्रीवादळ गेल्या सहा तासांत ताशी सुमारे १३ किलोमीटर वेगाने वायव्येकडे सरकत आहे. २८ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत ते तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात या वादळाचा परीणाम म्हणून, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर व मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक, केरळ, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि प. बंगालमध्ये मुसळधार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या राज्यांतील प्रशासन सतर्क झाले आहे.
ओडिशामधील गंजम जिल्हा प्रशासनाने सोमवारी ‘मोंथा’ चक्रीवादळाच्या आगमनापूर्वी समुद्रात अडकलेल्या शेजारच्या आंध्र प्रदेशातील १०० हून अधिक मच्छिमारांना आश्रय दिला. गंजमचे जिल्हाधिकारी कीर्ती वासन व्ही. यांनी सांगितले की, परिस्थिती सामान्य झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ राज्यात पाठवले जाईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आंध्र प्रदेशातील विविध भागातील २८ मच्छिमार २८ बोटींमध्ये मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाच्या हालचालीमुळे समुद्राच्या लाटा तीव्र आणि धोकादायक बनल्या, ज्यामुळे ते अडकले.
सोमवारी दुपारी मच्छिमारांनी त्यांच्या बोटींसह गोपालपूर बंदरात आश्रय घेतला. जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप केल्यानंतर, बंदर अधिकाऱ्यांनी त्यांना सुरक्षित क्षेत्रात राहण्याची परवानगी दिली. मोंथा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दोन डझनहून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

























































