IND vs PAK – निडर राहा, बेजबाबदार नाही! हिंदुस्थान-पाक सामन्यापूर्वी सुनील गावस्करांचा टीम इंडियाला मोलाचा सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी हिंदुस्थानचे माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी हिंदुस्थानी फलंदाजांना मोलाचा सल्ला दिला आहे. हिंदुस्थानी संघाने या स्पर्धेत आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली असली तरी, पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात फलंदाजांनी निडर आणि बेजबाबदार यातील पुसट रेषा ओळखून खेळावे, असे मत गावस्करांनी व्यक्त केले आहे.

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी गावस्कर यांनी हिंदुस्थानी फलंदाजीच्या शैलीवर भाष्य केले. ते म्हणाले की, आधुनिक टी-२० क्रिकेटमध्ये आक्रमक खेळणे गरजेचे आहे, मात्र ही आक्रमकता सांभाळून आणि संयमी असायला हवी. अनेकदा फलंदाज मैदानात गेल्यावर पहिल्या चेंडूपासून मोठे फटके मारण्याच्या नादात आपली विकेट गमावतात. पाकिस्तानसारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळताना अशा चुका महागात पडू शकतात. त्यामुळे फलंदाजांनी खेळपट्टीचा अंदाज घेऊन आणि परिस्थितीनुसार आपली रणनीती आखून फटकेबाजी करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.