दुष्काळाच्या प्रश्नावर व्यापक जनआंदोलनाची तयारी : प्रा.शशिकांत गाडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर 

एका छोट्या गावात मोठा निधी आणणे ही मोठी गोष्ट असते. ते काम जिल्हा परिषद व पंचायत समितीतील महाआघाडीचे सर्व सदस्य करीत आहेत. याशिवाय विकासकामे दर्जेदार होतील याकडेही कटाक्षाने दिले जाते. सरकारी कामांचा सर्वसामान्यांचा अनुभव चांगला नसतो. काँक्रिटिकरणाचे काम तर वर्षभरात जैसे थे होते. हे प्रकार थांबले पाहिजे. मतदारांनी दिलेल्या संधीचे सोने करण्याचे काम महाआघाडीचे लोकप्रतिनिधी करीत आहे. यावर्षी ग्रामीण भागात भयावह दुष्काळी परिस्थिती आहे. नगर तालुक्यात टँकरची मागणी वाढत आहे. मजुरांना कामाची प्रतिक्षा आहे. जनावरांच्या चारा छावण्या सुरू होणार असल्या तरी त्यासाठीचे निकष जाचक आहेत. त्यामुळे पशुधन वाचविण्यासाठी आता सरकारशी संघर्ष करावा लागणार आहे.  शिवसेना सरकारमध्ये असली तर शिवसेनेची बांधिलकी जनतेची असून चारा छावण्या, रोजगार, पाणी या प्रश्नांसाठी व्यापक जनआंदोलन करण्याची तयारी आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी केले.

नगर तालुक्यातील सांडवे येथे पाझर तलाव दुरुस्ती, बंधारा दुरूस्ती, सिमेंट काँक्रिट रस्ता आदी सुमारे 60 लाखांच्या कामांचे भूमीपूजन नुकतेच करण्यात आले. यावेळी प्रा.गाडे बोलत होते. कार्यक्रमास काँग्रेसचे नेते संपतराव म्हस्के, पंचायत समिती सभापती रामदास भोर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले आदी उपस्थित होते.

संदेश कार्ले म्हणाले की, सांडवे गावात 2 पाझर तलावे, बंधारे दुरस्ती अशा सुमारे 60 लाखांच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले आहे. सरकारी पैशातून होणारे काम हे पूर्णपणे दर्जेदार करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधी म्हणून आपणही दक्ष राहणार आहोत.